ममता बॅनर्जींना मोठा धक्का: सत्ता जाताच घराबाहेरील सुरक्षा हटवली, हायटेक गेट काढले; बंगालमध्ये नव्या युगाची सुरुवात

कोलकाता (pragatbharat.com) : पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, १५ वर्षांच्या सत्तेनंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला (TMC) पराभवाचा धक्का बसला आहे. या पराभवाच्या २४ तासांच्या आतच प्रशासकीय हालचालींना वेग आला असून, ममता बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील निवासस्थानाबाहेरील विशेष सुरक्षा व्यवस्था आणि ‘हायटेक’ यंत्रणा हटवण्यात आली आहे.

घराबाहेरील सुरक्षा कमी, रस्ता खुला: मुख्यमंत्री असताना ममता बॅनर्जी यांच्या घराबाहेर सुरक्षेच्या कारणास्तव पोलादी अॅडव्हान्स ऑटोमेटेड गेट बसवण्यात आले होते. तसेच, या परिसरातील रस्ता सर्वसामान्यांसाठी बंद असायचा. मात्र, निवडणुकीत पराभव होताच प्रशासनाने हे स्वयंचलित गेट तातडीने हटवले असून, हा रस्ता आता सर्वसामान्य लोकांसाठी खुला केला आहे. यासोबतच त्यांच्या निवासस्थानाबाहेरील अतिरिक्त पोलीस ताफाही कमी करण्यात आला आहे.

भाजपचा दणदणीत विजय: निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, २९४ जागांच्या पश्चिम बंगाल विधानसभेत भाजपने २०७ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर टीएमसीला केवळ ८० जागांवर समाधान मानावे लागले. खुद्द ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर मतदारसंघातून भाजपच्या शुभेंदु अधिकारी यांनी सुमारे १५ हजार मतांनी पराभव केला आहे.

२२ मंत्र्यांचा दारूण पराभव: या निवडणुकीत टीएमसी सरकारमधील ३५ पैकी २२ मंत्र्यांना जनतेने नाकारले आहे. यात शिक्षण, परिवहन, गृहनिर्माण आणि उद्योगासारख्या महत्त्वाच्या खात्यांच्या मंत्र्यांचा समावेश आहे. बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याने, आता राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *