
नवी दिल्ली/बेंगळुरू (pragatbharat.com) : ऑनलाइन गेमिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ‘गेम्सक्राफ्ट’ (Gameskraft Technologies) या प्रसिद्ध ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मच्या तीन संस्थापकांना अटक केली आहे. दीपक सिंग, पृथ्वीराज सिंग आणि विकास तनेजा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. फसवणूक आणि मनी लाँड्रिंगच्या (PMLA) आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेली माहिती अशी की, गेम्सक्राफ्ट ग्रुप, त्याचे संस्थापक आणि कर्मचाऱ्यांशी संबंधित कर्नाटक आणि दिल्ली-एनसीआरमधील एकूण १७ ठिकाणांवर गुरुवारी (७ मे) ईडीने छापे टाकले होते. या छापेमारीत अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यानंतर ८ मे २०२६ रोजी या तिन्ही मुख्य प्रवर्तकांना बेड्या ठोकण्यात आल्या. हे संस्थापक ‘रमी कल्चर’ (RummyCulture) आणि ‘रमीटाईम’ (Rummytime) यांसारख्या प्रसिद्ध ऑनलाइन रियल मनी गेमिंग ॲप्सचे संचालन करत होते.
या कंपनीवर फसवणुकीचे अनेक गुन्हे (FIR) दाखल असून, काही पीडितांनी या गेमिंग प्लॅटफॉर्मवर फसवणूक झाल्यामुळे आत्महत्या केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी यापूर्वीच कंपनीची सुमारे १८.५७ कोटी रुपयांची बँक खाती गोठवण्यात आली होती. सध्या विकास तनेजाला बेंगळुरू न्यायालयात हजर करण्यात आले असून, इतर दोन आरोपींना ट्रान्झिट रिमांडवर बेंगळुरूला नेण्यात आले आहे.

