
धुळे (pragatbharat.com) : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीत सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र असतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. धुळ्यातील बडे नेते आणि माजी आमदार फारुक शहा हे पक्षावर प्रचंड नाराज असून, ते लवकरच ‘अॅक्शन मोड’मध्ये येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
नेमकी नाराजी कशामुळे? मिळालेल्या माहितीनुसार, माजी आमदार फारुक शहा यांनी पक्षात वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचा आरोप केला आहे. मतदारसंघातील विकासकामे रखडलेली असणे आणि पक्षांतर्गत दुर्लक्ष होत असल्याने शहा यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी नुकतीच धुळ्यात आपल्या कट्टर समर्थक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे समजते.
पुढच्या आठवड्यात मोठा निर्णय? राज्यात सध्या ‘ऑपरेशन तुतारी’ आणि ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा जोरात असतानाच, फारुक शहा यांनी पक्षाला एक आठवड्याचा अल्टीमेटम दिला आहे. जर आठ दिवसांत वरिष्ठांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, तर फारुक शहा यांच्यासह ९ नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्ते पक्षाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. शहा पुढच्या आठवड्यात आपली अंतिम भूमिका जाहीर करणार असल्याने, अजित पवार गट यावर काय तोडगा काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

