ठाण्यात पहाटे आगीचे तांडव! कोपरी भागात उभ्या असलेल्या ३ दुचाकी जळून खाक; रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

ठाणे (pragatbharat.com) : ठाणे पूर्व येथील कोपरी परिसरात शनिवारी पहाटेच्या सुमारास उभ्या असलेल्या दुचाकींना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. भास्कर टॉवरजवळ लागलेल्या या आगीत तीन दुचाकींचे मोठे नुकसान झाले असून, यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

१५ मिनिटांत आगीवर नियंत्रण प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने (RDMC) दिलेल्या माहितीनुसार, पहाटे ४:१९ च्या सुमारास या आगीची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी एका बंबासह घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून पहाटे ४:३४ वाजेपर्यंत म्हणजेच अवघ्या १५ मिनिटांत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. या आगीत एक टीव्हीएस ज्युपिटर (MH 04 MJ 8277) पूर्णपणे जळून खाक झाली आहे, तर एक होंडा ॲक्टिव्हा आणि एका ट्रायम्फ मोटारसायकलचे अंशतः नुकसान झाले आहे.

दुसऱ्या घटनेत १२ इलेक्ट्रिक मीटर्स खाक ठाण्यात आगीची ही दुसरी घटना असून, गुरुवारी पहाटे पाचपाखाडी परिसरातील ‘सारिका अपार्टमेंट’ या तीन मजली इमारतीच्या मीटर रूममध्येही आग लागली होती. या आगीत १२ वीज मीटर्स जळून खाक झाले. मीटर रूममधून येणाऱ्या धुरामुळे रहिवाशांमध्ये मोठी घबराट पसरली होती. अग्निशमन दलाने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दोन्ही घटनांमध्ये आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, पोलीस आणि अग्निशमन दल या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *