नसरापूर अत्याचार प्रकरण: ‘आता भीती आणि किळस वाटतेय’; चिमुरड्यांच्या मनात धडकी, पालकांमध्ये संताप आणि दहशतीचे वातावरण

नसरापूर (pragatbharat.com) : पुण्याजवळील नसरापूर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे पडसाद आता स्थानिक कुटुंबांवर आणि लहान मुलांच्या मानसिकतेवर उमटू लागले आहेत. “आमच्या नातीला खाली चल म्हटले तरी ती आता येत नाही, ती प्रचंड घाबरली आहे,” अशा शब्दांत येथील महिला आपली भीती व्यक्त करत आहेत.

घटनेच्या भीषणतेमुळे गावातील लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण असून, पालकांनी मुलांना घराबाहेर सोडणे बंद केले आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली, त्याच्या अगदी जवळ शाळा असल्याने “मुलांना शाळेत सुरक्षित कसे पाठवायचे?” असा गंभीर प्रश्न पालकांसमोर उभा ठाकला आहे. एरवी मैदानावर खेळणारी मुले आता घरातच कोंडून राहिली आहेत.

या घटनेचा धसका इतका मोठा आहे की, सुट्टीसाठी माहेरी आलेल्या लेकींनीही गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एका स्थानिक महिलेने सांगितले की, “माझी मुलगी दोन वर्षांच्या नातीला घेऊन सुट्टीसाठी आली होती, पण ही घटना ऐकताच ती त्याच रात्री सासरी परतली. तिला आपल्या लेकीच्या सुरक्षिततेची काळजी वाटू लागली, म्हणून आम्हीही तिला सुखरूप घरी पाठवून दिले.”

नसरापूरमध्ये या घटनेनंतर ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन केले आणि पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दोन दिवसांनंतर बाजारपेठ सुरू होऊन गाव संथपणे पूर्वपदावर येत असले, तरी लोकांच्या मनातील दहशत आणि किळस कमी व्हायला तयार नाही. पालकांमध्ये आपल्या पाल्यांच्या सुरक्षिततेबाबत अद्यापही चिंतेचे वातावरण कायम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *