तमिळनाडूमध्ये ‘थलपती’ विजय युगाचा प्रारंभ: नेहरू स्टेडियमवर थोड्याच वेळात मुख्यमंत्रीपदाचा ऐतिहासिक शपथविधी

चेन्नई (pragatbharat.com) : तमिळनाडूच्या राजकारणात आज एक सुवर्णपान लिहिले जात आहे. लोकप्रिय अभिनेते आणि ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाचे अध्यक्ष सी. जोसेफ विजय आज १० मे २०२६ रोजी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर हा भव्य शपथविधी सोहळा सकाळी १० वाजता पार पडणार असून, त्याची तयारी पूर्ण झाली आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय यांच्या पक्षाने १०८ जागा जिंकून सर्वांना चकित केले. गेल्या दोन दिवसांपासून बहुमतासाठी सुरू असलेली आकड्यांची जुळवाजुळव अखेर यशस्वी ठरली आहे. काँग्रेस (५ आमदार), व्हीसीके (२), सीपीआय (२), सीपीआय-एम (२) आणि आययूएमएल (२) या पक्षांनी पाठिंबा दिल्याने विजय यांच्या आघाडीचे संख्याबळ १२० वर पोहोचले आहे, जे बहुमताच्या ११८ या आकड्यापेक्षा जास्त आहे. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी शनिवारीच विजय यांची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली.

विजय यांच्यासोबत त्यांचे ९ मंत्री देखील शपथ घेण्याची शक्यता आहे. यामध्ये ‘बुसी’ आनंद, आधव अर्जुना आणि के. ए. सेंगोट्टयन यांसारख्या महत्त्वाच्या नावांचा समावेश आहे. गेल्या सहा दशकांपासून तमिळनाडूमध्ये असलेल्या DMK आणि AIADMK या दोन द्रविडी पक्षांच्या वर्चस्वाला छेद देऊन एका तिसऱ्या शक्तीचा उदय आज होत आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी तामिळनाडूच्या कानाकोपऱ्यातून हजारो चाहते आणि समर्थक चेन्नईत दाखल झाले आहेत. राज्यपालांनी विजय यांना १३ मे पर्यंत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *