
पुणे (pragatbharat.com) : रशिया-युक्रेन आणि इतर जागतिक युद्धांमुळे जगभरातील वितरण व्यवस्था विस्कळीत झाली असून, त्याचे गंभीर परिणाम भारतावरही होत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नऊ महत्त्वाची आवाहने केली आहेत. या आवाहनांचे स्वागत करत, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही योग्य वेळेला केलेली योग्य सूचना असल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधानांची नऊ महत्त्वाची आवाहने: हैदराबाद येथील भाषणात पंतप्रधानांनी जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी नागरिकांना काही गोष्टींवर मर्यादा आणण्याचे आवाहन केले: १. पेट्रोल आणि डिझेलचा वापर जपून करणे. २. खाद्यतेलाचा वापर मर्यादित करणे. ३. पुढील एक वर्ष सोने खरेदी टाळणे. ४. परदेशी प्रवास टाळून परकीय चलन वाचवणे. ५. जास्तीत जास्त मेट्रो आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणे. ६. शक्य असल्यास ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ऑनलाईन बैठकांना प्राधान्य देणे. ७. परकीय उत्पादनांऐवजी स्वदेशी वस्तूंची खरेदी करणे.
पुण्याच्या वाहतुकीवर चंद्रकांत पाटलांचे भाष्य: पुण्यातील वाढत्या वाहनांच्या संख्येवर चिंता व्यक्त करताना पाटील म्हणाले की, पुण्यात ५४ लाख वाहने झाली आहेत. प्रदूषण आणि इंधन बचतीसाठी नागरिकांनी मेट्रोचा वापर वाढवला पाहिजे. सध्या सव्वा दोन लाख पुणेकर मेट्रोने प्रवास करत असून, काम पूर्ण झाल्यावर ही संख्या ८ लाखांवर जाईल.
याशिवाय, सोलापूरमधील इंजिनिअरिंग कॉलेजच्या परवानगीसाठी AICTE कडे पाठपुरावा सुरू असून, गरज पडल्यास दिल्लीत जाऊन बसू, असेही त्यांनी स्पष्ट केले. रूपाली चाकणकर यांच्या चौकशीवर बोलताना त्यांनी पुराव्याशिवाय निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याचे सांगितले, तर कांदा प्रश्नावर जागतिक वितरण व्यवस्था विस्कळीत झाल्यामुळे निर्यातीवर परिणाम झाल्याचे मान्य केले.


