
ठाणे (pragatbharat.com) : ठाणे शहरात सोमवारी पहाटेच्या सुमारास आगीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्याने खळबळ उडाली. चराई आणि पाचपाखाडी परिसरातील दोन निवासी इमारतींच्या मीटर रूममध्ये ही आग लागली. सुदैवाने, दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एकूण ५२ इलेक्ट्रिक मीटर्स जळून खाक झाले आहेत.
पहिली घटना: ‘आनंद विल्हा’ इमारत, चराई चराई परिसरातील सात मजली ‘आनंद विल्हा’ इमारतीत पहाटे ४.०८ वाजण्याच्या सुमारास तळमजल्यावरील मीटर रूममध्ये भीषण आग लागली. आगीचे स्वरूप पाहून ४० फ्लॅटमधील रहिवाशांनी तातडीने इमारतीबाहेर धाव घेतली. ठाणे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे (RDMC) प्रमुख यासीन तडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने धाव घेत पहाटे ४.४० पर्यंत आग विझवली. या घटनेत ४० इलेक्ट्रिक मीटर्स पूर्णपणे खाक झाले असून, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दुसरी घटना: सारिका अपार्टमेंट, पाचपाखाडी दुसरी घटना पाचपाखाडी येथील सारिका अपार्टमेंटमध्ये पहाटे १.१२ वाजता घडली. तीन मजली इमारतीच्या मीटर रूममधून धूर येत असल्याचे पाहून रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अग्निशमन दलाने १.३५ पर्यंत ही आग आटोक्यात आणली. या आगीत १२ इलेक्ट्रिक मीटर्सचे नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर तासाभराने रहिवासी पुन्हा आपल्या घरात परतले.


