
पनवेल (pragatbharat.com) : पनवेल येथील अमिटी युनिव्हर्सिटीच्या (Amity University) कॅम्पसमध्ये दूषित अन्न आणि पाण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मेसमध्ये मिळणाऱ्या अन्नामुळे अन्नातून विषबाधा (Food Poisoning) होण्यासोबतच विद्यार्थ्यांना कावीळ (Jaundice) आणि हेपेटायटीस ए (Hepatitis A) सारखे गंभीर आजार जडल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, ‘स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’च्या (SFI) नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाने मंत्रालयात जाऊन राज्य सरकारकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. जानेवारी महिन्यापासून हा प्रकार सुरू असून, वारंवार तक्रार करूनही विद्यापीठ प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विद्यापीठ प्रशासन सर्व तपासण्या ‘FSSAI’ निकषांनुसार असल्याचे सांगत असले, तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या आजारपणामुळे संताप व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांच्या मुख्य मागण्या:
- विद्यार्थ्यांचा समावेश असलेली स्वतंत्र अन्न तपासणी समिती स्थापन करावी.
- मेस कंत्राटदार तातडीने बदलण्यात यावा.
- कॅम्पसमधील अन्न आणि पाण्याची नियमित व सक्तीची चाचणी व्हावी.
- आजारपणामुळे गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थितीमध्ये (Attendance) सवलत मिळावी.
राज्य सरकारने या प्रकरणी हस्तक्षेप करून तातडीने चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.


