पिंपरी-चिंचवड महापालिका: पाणीपुरवठा, रस्ते आणि आरोग्य सुधारण्यासाठी कोट्यवधींच्या विकासकामांना मंजुरी

पिंपरी-चिंचवड (pragatbharat.com) : शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आणि नागरिकांना सक्षम पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. या सभेला आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण: शहरातील वाढत्या लोकसंख्येची गरज ओळखून बिजलीनगर, दापोडी, सांगवी आणि बळवंतनगर परिसरातील जुन्या पाइपलाइन बदलून नवीन पाइपलाइन टाकण्याच्या कामाला हिरवा कंदील मिळाला आहे. तसेच निगडीचिखली जलशुद्धीकरण केंद्रांसाठी आधुनिक ‘ऑटो-क्लोरीनेशन सिस्टीम’ आणि आवश्यक रसायनांच्या खरेदीला मान्यता देण्यात आली आहे. थेरगाव, पिंपरी आणि रहाटणी परिसरातील जलनिस्सारण व्यवस्थेत सुधारणा करण्यात येणार आहे.

रस्ते आणि सार्वजनिक सुविधा: वाकड, पुनावळे आणि ताथवडे परिसरातील नव्याने ताब्यात आलेले रस्ते विकसित केले जाणार आहेत. तसेच पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव आणि काळेवाडी भागात रस्ते व फुटपाथ दुरुस्तीची कामे हाती घेतली जातील. विशेष म्हणजे, काळेवाडी येथील ज्योतिबा गार्डनमध्ये कुस्तीचा आखाडा आणि पिंपळे निलख येथे महिला बाजार हट केंद्र उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

आरोग्य आणि सुरक्षा: शहराच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून २१८ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार असून त्यांच्या वेतनासाठी खर्चाला मंजुरी दिली आहे. महापालिकेच्या शाळांसाठी इंटरनेट बँडविड्थ सेवा आणि जिजामाता रुग्णालयातील स्थापत्य कामांनाही गती मिळणार आहे. या निर्णयामुळे शहरातील मूलभूत सेवा अधिक सक्षम होतील, असा विश्वास सभापती अभिषेक बारणे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *