
मुंबई (pragatbharat.com) : वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथील एका ८०.८४ लाख रुपये किमतीच्या सदनिकेची बनावट ओळखपत्रे आणि अधिकृत कुलमुखत्यारपत्राचा (Power of Attorney) वापर करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी ‘न्यू बीकेसी अमन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी’मधील फ्लॅट क्रमांक ६११ च्या मूळ मालकाची तोतयागिरी केली. यासाठी बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्डचा वापर करण्यात आला. फेब्रुवारी २०२४ मध्ये या बनावट ओळखपत्रांच्या आधारे एक खोटे कुलमुखत्यारपत्र (PoA) तयार करून त्याची नोंदणी करण्यात आली. मुंबई-३० नोंदणी कार्यालयातील सहाय्यक उपनिबंधक मंगेश चौधरी यांनी या प्रकरणाची अंतर्गत चौकशी केली असता, सादर केलेली छायाचित्रे आणि स्वाक्षऱ्यांमध्ये तफावत आढळून आली.
मूळ मालक विलास किसन कराड यांच्या जागी एका तोतया व्यक्तीला उभे करून हा सर्व बनाव रचण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी सरदार अली शेख, असीमुननिसा शेख, मोहम्मद अली शेख आणि मोहम्मद हनीफ शेख यांच्यासह तोतयागिरी करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८ आणि ४७१ सह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मालमत्ता बीकेसीत असली तरी, नोंदणीची प्रक्रिया नाहूर-भांडुप दुय्यम निबंधक कार्यालयात झाल्याने भांडुप पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

