NDRF President’s Colour Award: एनडीआरएफने २० वर्षांत जिंकला १४० कोटी जनतेचा विश्वास; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून गौरव

गाझियाबाद (pragatbharat.com) : “देशात कुठेही आपत्ती आली किंवा येणार असेल, तर तिथे एनडीआरएफ (NDRF) चे जवान पोहोचले की जनतेला मोठा दिलासा मिळतो. गेल्या २० वर्षांच्या अल्प कालावधीत या दलाने देशातील १४० कोटी जनतेचा विश्वास संपादन केला आहे,” असे गौरवद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काढले. गाझियाबाद येथे आयोजित एनडीआरएफच्या ‘प्रेसिडेंट्स कलर’ (President’s Colour) पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

अमित शाह म्हणाले की, राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जाणारा हा बहुमान कोणत्याही दलासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. एनडीआरएफने केवळ देशातच नव्हे, तर जगभरात जिथे कुठे मदतकार्यासाठी गेले तिथे लोकांचे प्रेम आणि विश्वास मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने ‘डिझास्टर रिझिलिएंट इन्फ्रास्ट्रक्चर’ क्षेत्रात जागतिक नेतृत्व केले असून, आज ४८ देश या मोहिमेत भारतासोबत काम करत आहेत.

एनडीआरएफने आतापर्यंत ८,५०० पेक्षा जास्त जवान, १० हजार नागरी संरक्षण कर्मचारी आणि २ लाख २० हजारांहून अधिक स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात भारत आज ‘फर्स्ट रिस्पॉन्डर’ आणि जागतिक नेता म्हणून उभा राहिला आहे, असेही शाह यांनी यावेळी नमूद केले. या कार्यक्रमात एनडीआरएफ, एसडीआरएफ, एनसीसी आणि हजारो ‘आपदा मित्रां’च्या कार्याचेही कौतुक करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *