
पुणे (pragatbharat.com) : पुणे शहरातील हडपसर परिसरात असलेल्या ‘कामधेनु इस्टेट’मधील एका नामांकित सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये गुरुवारी मध्यरात्री जिवंत बॉम्ब सापडल्याने संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये टायमरसह स्फोटके लावण्यात आल्याचे समोर आले असून, पोलिसांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
७ तासांचा टायमर अन् लो ग्रेड आयईडी: मिळालेल्या माहितीनुसार, नागरिकांनी एका संशयास्पद पांढऱ्या रंगाच्या वस्तूमध्ये सर्किट आणि डिजिटल टायमर असल्याचे पाहिले. या वस्तूमध्ये सात तासांचा टायमर सेट करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात हा बॉम्ब ‘लो ग्रेड आयईडी’ (Low Grade IED) असल्याचे निष्पन्न झाले. टायमरवर उरलेला वेळ पाहून पोलिसांनी तात्काळ परिसराची नाकेबंदी केली आणि रुग्ण तसेच कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवले.
ग्लायडिंग सेंटरमध्ये बॉम्ब निकामी: परिस्थितीचे गांभीर्य ओळखून BDDS पथकाने अत्यंत खबरदारीने हा बॉम्ब ताब्यात घेतला. हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरच्या मोकळ्या मैदानात नेऊन हा जिवंत बॉम्ब यशस्वीरित्या निकामी करण्यात आला. यामुळे मोठा धोका टळला असला तरी, या घटनेमुळे रुग्ण आणि रहिवाशांमध्ये भीतीचे सावट कायम आहे.
इलेक्ट्रिक स्कूटरवरून आलेल्या संशयिताचा शोध: या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आता आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमध्ये एक संशयित व्यक्ती इलेक्ट्रिक स्कूटरवरून हॉस्पिटलमध्ये आल्याचे आणि ही स्फोटके ठेवून निघून गेल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थानिक पोलीस, पुणे गुन्हे शाखा आणि एटीएस (ATS) अशी एकूण तीन पथके तयार करण्यात आली आहेत. रस्त्यांवरील कॅमेऱ्यांच्या मदतीने संशयिताचा माग काढला जात असून, लवकरच त्याला ताब्यात घेण्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.


