
पुणे (pragatbharat.com) : भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांमुळे आणि गैरव्यवहारामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. अनेक महिलांचे लैंगिक शोषण, जादुटोणा आणि पैशांची अफरातफर केल्याचे गंभीर आरोप खरातवर आहेत. या प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक खळबळजनक ट्विट करत थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर निशाणा साधला आहे. गुवाहाटी येथील एका फोटोचा दाखला देत दमानिया यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी SIT (विशेष तपास पथक) कडे केली आहे.
महिला आयोग अध्यक्षपद आणि गुवाहाटी दौरा: दमानियांचे ३ गंभीर प्रश्न अंजली दमानिया यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून ट्विट करत या प्रकरणात तीन अत्यंत महत्त्वाचे आणि संशयास्पद मुद्दे उपस्थित केले आहेत:
१. पायऱ्या आणि पदाची वेळ: दमानिया यांनी म्हटले आहे की, २८ ऑगस्ट २०२१ रोजी रुपाली चाकणकर, प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात हे गुवाहाटीला गेले होते, अशी माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे. चाकणकर यांनी हे कुटुंबियांसोबतचे टूर असल्याचे म्हटले असले, तरी प्रत्यक्षात तिथे ३ लोक गेले होते की १२? याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे. विशेष म्हणजे, या दौऱ्यानंतर अवघ्या दोनच महिन्यांत चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती, याकडे दमानिया यांनी लक्ष वेधले आहे.
२. २ जुलैचा तो राजकीय भूकंप आणि गुवाहाटी कनेक्शन: दमानिया यांनी दुसरा मोठा दावा करताना ३० जून २०२३ या तारखेचा उल्लेख केला आहे. ३० जून रोजी चाकणकर पुन्हा गुवाहाटीला गेल्या होत्या आणि २ जुलै रोजी परत आल्या. नेमक्या याच दिवशी म्हणजेच २ जुलै २०२३ रोजी अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात बंडखोरी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. या दोन्ही घटनांच्या टायमिंगवर दमानिया यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
३. SIT कडे पुराव्यांची रवानगी: “हा फोटो गुवाहाटीतील प्रसिद्ध रॅडिसन ब्लू हॉटेलचा वाटत नाही, याचे गूढ वेगळेच आहे. मी ही सर्व माहिती आणि संशयास्पद पुरावे SIT ला पाठवले असून त्यांना या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्याची विनंती केली आहे,” असा दावा दमानिया यांनी केला आहे.
वादामुळे गमवावे लागले होते पद: भोंदू अशोक खरात याला रुपाली चाकणकर यांनी गुरू मानले होते आणि त्यांची पाद्यपूजा केल्याचे फोटोही यापूर्वी समोर आले होते. या वाढत्या वादामुळे आणि खरातच्या कुटुंबीयांसोबत असलेल्या संबंधांच्या आरोपांमुळे चाकणकर यांना काही काळापूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता दमानिया यांच्या या नव्या दाव्यामुळे आणि एसआयटीकडे गेलेल्या तक्रारीमुळे चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

