
सातारा (pragatbharat.com) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने प्रधानमंत्री आवास योजनेत (PMAY) ऐतिहासिक आणि विक्रमी कामगिरी केली आहे. राज्यात एकाच वर्षात तब्बल ५ लाख घरे पूर्ण करून लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घरांच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले आहे. हे यश मैलाचा दगड ठरले असून, पुढील वर्षी आणखी १५ लाख घरांचे वितरण करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यात केली.
सातारा येथील ऐतिहासिक सैनिक स्कूल मैदानावर आयोजित भव्य घरकुल वितरण सोहळ्यात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. या प्रसंगी केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महाराष्ट्राला ग्रामविकास योजनेअंतर्गत ९००० कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
घरकुलासाठी अतिरिक्त ५० हजार आणि मोफत वीज: मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, २०१६ ते २०२२ दरम्यान राज्याला १२ लाख ९० हजार घरांचे उद्दिष्ट मिळाले होते. मात्र, गरजूंची संख्या वाढल्याने आणखी ३० लाख घरांची गरज आहे. त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे. विशेष म्हणजे, राज्य सरकारकडून प्रत्येक घरकुलासाठी अतिरिक्त ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. तसेच, आवास योजनेतील लाभार्थ्यांना सौरऊर्जेसाठी विशेष अनुदान देऊन आयुष्यभर मोफत वीज उपलब्ध करून देण्याचा क्रांतिकारी निर्णय सरकारने घेतला आहे.
३० जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीची तयारी: शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पूर्णपणे सकारात्मक असून, ३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करण्याची तयारी सुरू आहे. तसेच, नियमित कर्जफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल. कांदा उत्पादक आणि साखर उद्योगातील समस्या सोडवण्यासाठी केंद्रीय स्तरावर तातडीने बैठका घेऊन दिलासा दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
५० लाख महिला बनल्या ‘लखपती दीदी’: महिला सक्षमीकरणाचा पाढा वाचताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांत राज्यातील ५० लाख महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्यात सरकारला यश आले असून, आता हे लक्ष्य १ कोटी महिलांपर्यंत नेण्यात येणार आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विक्रमी वेळेत ५ लाख घरांचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. तर, “महाराष्ट्रात एकही माणूस बेघर राहणार नाही, हे मोदींचे स्वप्न आम्ही पूर्ण करू,” अशी ग्वाही जयकुमार गोरे यांनी आपल्या भाषणात दिली.


