‘ते क्षमतेचे नेते…’; तटकरे-पटेल यांच्या कौतुकामुळे राजकीय वर्तुळात खळबळ, शरद पवारांच्या विधानाने भुवया उंचावल्या

मुंबई (pragatbharat.com) : राजकारणात कधीच कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो आणि शत्रूही नसतो, याचा प्रत्यय महाराष्ट्रातील जनतेला वारंवार येत असतो. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या एका ताज्या विधानाने राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. कालपर्यंत ज्या नेत्यांवर पक्षफुटीचा आरोप करत शरद पवार गट जोरदार टीका करत होता, त्याच सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांचे शरद पवारांनी अचानक कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शरद पवारांच्या या भूमिकेमुळे राजकीय पंडितांमध्येही विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.

अजित पवार गटातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर? सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद आणि कुरबुरी सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. नुकतेच अजित पवार गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या एका पत्रात खासदार सुनील तटकरे यांच्या नावासमोर ‘प्रदेशाध्यक्ष’ पदाचा उल्लेख नसल्याचे समोर आले आहे. तसेच प्रफुल पटेल यांनाही पक्षात डावलले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची थेट भेट घेतली होती. ही भेट केवळ प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी होती, असे सांगत तटकरे यांनी चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला असला, तरी राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

शरद पवारांची ‘गुगली’ आणि कौतुकाचा वर्षाव: या सर्व घडामोडींवर माध्यम प्रतिनिधींनी विचारले असता, शरद पवार यांनी तटकरे आणि पटेल यांच्याबद्दल आश्चर्यकारक विधान केले. पवार म्हणाले, “सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे दोन्ही नेते अत्यंत क्षमता असणारे नेते आहेत. त्यांच्या या क्षमतेचा वापर कसा करून घ्यावा, हा त्यांच्या आत्ताच्या नेतृत्वाचा (अजित पवार) अधिकार आहे.”

पवारांच्या अनिश्चित राजकारणाचा नवा अंक? स्वतः शरद पवार आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांनी यापूर्वी तटकरे आणि पटेल यांना थेट टार्गेट केले होते. पक्षफुटीसाठी प्रामुख्याने या दोन नेत्यांना जबाबदार धरले जात होते. मात्र, आता अचानक पवारांनी मवाळ भूमिका घेत त्यांचे कौतुक केल्याने, अजितदादांच्या राष्ट्रवादीमधील दुहीचा शरद पवार आपल्या राजकीय फायद्यासाठी तर वापर करत नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. राजकीय अनिश्चिततेसाठी ओळखले जाणारे शरद पवार आगामी काळात कोणती नवी चाल खेळणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *