
मुंबई (pragatbharat.com) : आयपीएल २०२६ (IPL 2026) च्या प्लेऑफची रेस आता अत्यंत रोमांचक आणि अटीतटीच्या स्थितीत पोहोचली आहे. नुकत्याच पार पडलेल्या सामन्यात लखनऊ सुपर जाएन्ट्सने (LSG) दिग्गज चेन्नई सुपर किंग्जला (CSK) धूळ चारली आणि या एका विजयाने प्लेऑफचे संपूर्ण समीकरणच बदलून टाकले आहे. मिशेल मार्शच्या वादळी खेळीनंतर लखनऊने हा सामना ७ विकेट्सने आपल्या नावावर केला. लखनऊच्या सलामीवीरांनी रचलेल्या १३५ धावांच्या मजबूत भागीदारीमुळे चेन्नईच्या हातातून मॅच निसटली असून ऋतुराज गायकवाडच्या पलटणला हा मोठा धक्का मानला जात आहे.
चेन्नईच्या अडचणी वाढल्या; इतर संघांवर अवलंबित्व: चेन्नईच्या प्लेऑफच्या प्रवासासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. या पराभवानंतर चेन्नईच्या खात्यात सध्या १२ पॉईंट्स असून त्यांच्या हातात आता केवळ २ सामने शिल्लक आहेत. यामुळे चेन्नई संघ जास्तीत जास्त १६ अंकांपर्यंतच पोहोचू शकतो. परिणामी, आता चेन्नईला स्वतःचे सामने जिंकण्यासोबतच इतर संघांच्या कामगिरीवर आणि गणितीय समीकरणांवर अवलंबून राहावे लागणार आहे.
प्लेऑफचे ताजे टक्केवारी समीकरण: क्रिकेट तज्ज्ञांच्या आणि सांख्यिकीनुसार, या पराभवानंतरही चेन्नईची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता २८.४% इतकी जिवंत आहे. दुसरीकडे, चेन्नईच्या या पराभवाचा थेट फायदा इतर संघांना झाला आहे. पंजाब किंग्जची प्लेऑफची शक्यता आता थेट ४८% वर पोहोचली आहे, तर राजस्थान रॉयल्सची (RR) शक्यता ५१.६% पर्यंत वाढली आहे. या निकालामुळे सनरायझर्स हैदराबादच्या (SRH) ड्रेसिंग रूममध्येही आनंदाचे वातावरण आहे.
पुढचे ४८ तास ठरणार ‘गेमचेंजर’: आयपीएलच्या रणसंग्रामात आता येणारे ४८ तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत, कारण या काळात प्लेऑफमध्ये जाणाऱ्या किमान तीन टीमचे स्थान निश्चित होण्याची शक्यता आहे. प्लेऑफचे तिकीट पक्के करण्यासाठी आरसीबी (RCB), गुजरात टायटन्स (GT) आणि सनरायझर्स हैदराबाद यांना पुढील ४८ तासांत आपला आगामी सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. तर चेन्नई सुपर किंग्जच्या अस्तित्वासाठी आता १८ मे २०२६ ही तारीख सर्वात मोठी आणि ‘करो या मरो’ची ठरणार आहे.

