Modi Cabinet Expansion 2026: मोदी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार? २१ मे रोजी महत्त्वाची बैठक; महाराष्ट्राला संधी मिळणार की हुकणार?

नवी दिल्ली (pragatbharat.com) : केंद्र सरकार आणि भाजपच्या राष्ट्रीय संघटनेत आगामी काळातील मोठ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर लवकर ही फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अलिकडेच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये, विशेषतः पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक यश मिळवून पहिल्यांदाच सत्ता स्थापन केल्यानंतर, भाजपने आता पुढील निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या अंतर्गत, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन पक्षात संघटनात्मक बदल करण्याच्या तयारीत असून, केंद्रीय मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि फेरबदल देखील लवकरच होण्याची चिन्हे आहेत.

९ जून २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात एकही बदल किंवा विस्तार झालेला नाही. जेडीयू (JDU) आणि तेलुगु देसम पार्टी (TDP) सारख्या मित्रपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच मोठ्या फेरबदलाच्या चर्चांना वेग आला आहे.

२१ मे २०२६ रोजी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ मे २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिपरिषदेची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि पक्षसंघटनेतील बदलांबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. भाजप सध्या २०२७ मधील विधानसभा निवडणुका, राष्ट्रपती निवडणूक आणि थेट २०२९ च्या लोकसभा निवडणुकांची रणनीती डोळ्यांसमोर ठेवून या बदलांचे नियोजन करत आहे. आगामी काळात उत्तर प्रदेश आणि पंजाबसारख्या राज्यांमध्ये निवडणुका होणार असल्याने तिथे भक्कम नेतृत्वाची गरज आहे.

युवा, महिला आणि नवीन चेहऱ्यांना प्राधान्य: २०२७ मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. पुढील दशकाचे राजकारण डोळ्यांसमोर ठेवून भाजप यावेळी मंत्रिमंडळात आणि राष्ट्रीय कार्यकारिणीत युवा नेते, महिला आणि काही अनुभवी व्यावसायिक चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे. सध्या मंत्री असलेल्या काही ज्येष्ठ नेत्यांना पक्षविस्तारासाठी संघटनात्मक जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात, तर काही माजी प्रदेशाध्यक्षांना केंद्रीय कॅबिनेटमध्ये स्थान मिळू शकते.

महाराष्ट्राचे काय? प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता कमी: या संभाव्य फेरबदलांमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला काय येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राला नवीन प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. आगामी काळात ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत, त्या राज्यांमधील चेहऱ्यांना या फेरबदलात अधिक प्राधान्य दिले जाणार असल्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला फारसे काही येण्याची शक्यता सध्यातरी दिसत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *