धक्कादायक! ८ लाखांचे आमिष दाखवून सोशल मीडियावर अवैध ‘सरोगसी रॅकेट’; तरुणी आणि विवाहित महिलांना जाळ्यात ओढल्याचा आरोप

छत्रपती संभाजीनगर (pragatbharat.com) : सोशल मीडियाच्या वाढत्या वापरासोबतच सायबर गुन्हेगार आणि मानवी तस्करांनी आता एक नवा आणि धक्कादायक मार्ग निवडल्याची बाब समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरसह राज्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून अवैध सरोगसीचे (Surrogacy Racket) मोठे रॅकेट चालवले जात असल्याचा खळबळजनक आरोप होत आहे. विवाहित महिलांसह अविवाहित तरुणींना सोशल मीडियावर जाळ्यात ओढून, त्यांना ७ ते ८ लाख रुपयांचे मोठे आमिष दाखवून गर्भाशय भाड्याने देण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे.

देशभरातील बड्या शहरांमध्ये कनेक्शन; महिलांना डांबल्याचा आरोप: मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरून संपर्कात आलेल्या महिला व तरुणींची वैयक्तिक माहिती, फोटो आणि वैद्यकीय तपशील आधी मागवून घेतला जातो. त्यानंतर त्यांना बेंगळुरू, कोलकाता, हैदराबाद, दिल्ली, मुंबई आणि गुजरातसारख्या मोठ्या शहरांमध्ये आरोग्य तपासणीच्या बहाण्याने बोलावले जाते. तिथे सरोगसीची बेकायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, या महिलांना बाहेरील जगाशी संपर्क तोडून ठरावीक ठिकाणीच सक्तीने राहण्यास भाग पाडले जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात येत आहे.

कायदेशीर सरोगसीचे कडक नियम काय सांगतात? वैद्यकीय आणि कायदेशीर तज्ज्ञांच्या मते, भारतामध्ये सरोगसीसाठी अत्यंत कडक कायदे आहेत.

  • नातेवाईकांनाच परवानगी : मूल होत नसलेल्या दांपत्याच्या केवळ जवळच्या नातेवाइकालाच ‘सरोगेट मदर’ (Surrogate Mother) होता येते.
  • व्यावसायिक सरोगसीवर बंदी : सरोगसी हा पैसे कमावण्याचा किंवा व्यवसाय करण्याचा साधन असू शकत नाही, व्यावसायिक सरोगसी पूर्णपणे बेकायदेशीर आहे.
  • खर्च आणि विमा बंधनकारक : सरोगेट मातेसोबत कायदेशीर करार करणे, तिचा वैद्यकीय विमा काढणे आणि गर्भधारणेदरम्यानचा संपूर्ण वैद्यकीय खर्च उचलणे कायद्याने बंधनकारक आहे.

तज्ज्ञांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन: अवैध पद्धतीने सरोगसीचा व्यवसाय करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. सोशल मीडियावरील अशा फसव्या आणि पैशांच्या मोठ्या आमिषांना बळी पडू नका, तसेच आपली गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तींना शेअर करू नका, असे आवाहन कायदेतज्ज्ञ आणि पोलीस प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *