नंदुरबारच्या नवापुरात बर्ड फ्ल्यूचा हाहाकार! ४ लाख कोंबड्यांचे कलिंग, २५ लाख अंडी नष्ट; शहरात चिकन, बिर्याणी आणि अंडी विक्रीवर पूर्ण बंदी

नंदुरबार (pragatbharat.com) : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर (Navapur) परिसरात बर्ड फ्ल्यूचा (Bird Flu) प्रादुर्भाव दिवसागणिक वेगाने वाढत असल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या वतीने युद्धपातळीवर मोठे ‘कलिंग ऑपरेशन’ (Culling Operation) राबवले जात आहे. नवापूरमध्ये बर्ड फ्ल्यूची ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता आता केंद्रीय पशुसंवर्धन विभागाने थेट दखल घेतली असून, केंद्राचे विशेष पथक पुढील आठवड्यात पुन्हा सविस्तर पाहणीसाठी नवापूर दौऱ्यावर येणार आहे.

४ लाख कोंबड्यांचे कलिंग, २४ लाख अंडी नष्ट: मिळालेल्या माहितीनुसार, नवापूरमधील आतापर्यंत ९ पोल्ट्री फार्मचा बर्ड फ्ल्यू अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संसर्ग अधिक पसरू नये यासाठी प्रशासनाने १५ पोल्ट्री फार्ममधील तब्बल ४ लाख ६ हजार कोंबड्यांचे कलिंग केले आहे. यासोबतच २४ लाख ९१ हजार अंडी आणि तब्बल ५४८ टन पक्ष्यांचे खाद्यपदार्थ पूर्णपणे नष्ट करण्यात आले आहेत. या प्रचंड नुकसानामुळे स्थानिक पोल्ट्री व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्यात चिंतेचे सावट आहे.

चिकन, बिर्याणी आणि अंडी विक्रीवर पूर्ण बंदी: नवापूर शहरात तिसऱ्यांदा बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला असून, यापूर्वी २००६ आणि २०२१ मध्येही येथे अशाच प्रकारचा उद्रेक नोंदवला गेला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, बाधित क्षेत्राच्या १ किलोमीटर परिघातील पक्षी आणि अंडी नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नवापूर नगरपरिषदेने शहरात चिकन, अंडी आणि बिर्याणी सेंटर विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. “या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा इशारा मुख्याधिकारी मयूर पाटील यांनी दिला आहे. प्रशासनाने नागरिकांना न घाबरता सरकारी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *