धुळ्यात काळजाचा थरकाप! शनी अमावस्येच्या पूजेसाठी गेलेल्या मित्र-मैत्रिणीचा भोंदूबाबाच्या मठात भयानक शेवट; केसरी रुमालाने फुटले बिंग

धुळे (pragatbharat.com) : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात आणि सोलापूरच्या ‘मनोहर मामा’च्या भोंदूगिरीच्या घटना ताज्या असतानाच, आता धुळे जिल्ह्यातून अंधश्रद्धेची एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. साक्री तालुक्यातील जैताणे येथे एका भोंदूबाबाने शनी अमावस्येच्या रात्री विशेष पूजाविधीसाठी आलेल्या एका तरुण आणि तरुणीची मठातच अत्यंत निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यात तीव्र संताप आणि खळबळ उडाली आहे.

रस्त्याच्या कडेला आढळला तरुणीचा मृतदेह: जयश्री रजनीकांत काकुस्ते (वय २५, व्यवसाय- फायनान्स कंपनी कर्मचारी) आणि अक्षय गंगाधर सोनवणे (व्यवसाय- ग्रामपंचायत शिपाई व केबल व्यावसायिक) अशी मृत पावलेल्या दोघा मित्र-मैत्रिणींची नावे आहेत. शनिवारी सकाळी साक्री तालुक्यातील निजामपूर परिसरातील रायपूर-भडगाव रस्त्यावरील टेंबे फाट्याजवळ एका शेतात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. संशयिताने या तरुणीचे तोंड रुमालाने बांधले होते आणि तिच्या मृतदेहावर एक दुचाकी टाकून दिली होती, जेणेकरून हा अपघाताचा प्रकार वाटावा. निजामपूर पोलिसांनी तात्काळ फॉरेन्सिक टीमला पाचारण करून वैज्ञानिक पुरावे गोळा केले असता, हा मृतदेह जयश्रीचा असल्याचे निष्पन्न झाले.

‘त्या’ एका केसरी रुमालाने फुटले भोंदूचे बिंग! घटनास्थळाचा पंचनामा करताना पोलिसांना एक केसरी रंगाचा रुमाल आढळून आला, जो तपासात सर्वात महत्त्वाचा दुवा ठरला. पोलीस श्वान पथकाला (Dog Squad) हा रुमाल सुंघवण्यात आला असता, श्वानाने माग काढत थेट भोंदूबाबा योगेश ऊर्फ भैय्या बापू खैरनार (रा. जैताणे) याच्या मठाचा रस्ता दाखवला. पोलिसांनी संशयावरून तात्काळ या भोंदूबाबाला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पूजाविधीदरम्यान वाद अन् थरारक शेवट: मृत जयश्रीचे काका संजय हिरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जयश्री आणि अक्षय हे दोघे शनी अमावस्येच्या रात्री विशेष पूजेसाठी भोंदूबाबा योगेश खैरनार याच्या आश्रमात गेले होते. तेथे पूजाविधी सुरू असताना त्यांच्यात काही कारणावरून जोरदार वाद झाला. यानंतर भोंदूबाबाने संतप्त होऊन अक्षयच्या डोक्यात लोखंडी वस्तूने जबर वार करून त्याला जागीच संपवले, तर जयश्रीचा ओढणीने गळा आवळून तिचा जीव घेतला.

बैलगाडीतून मृतदेहाची विल्हेवाट: अटक टाळण्यासाठी या भोंदूबाबाने सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा खोटा बनाव रचला होता. मात्र, कडक चौकशीत त्याने अक्षयचा मृतदेह आश्रमाजवळ उंबरांडी येथील वनक्षेत्रात (शिवारात) नेऊन पुरल्याचे कबूल केले. धक्कादायक बाब म्हणजे, मृतदेह वाहून नेण्यासाठी त्याने बैलगाडीचा वापर केला होता, ज्याच्या चाकांचे निशाण जमिनीवर आढळून आले. पोलिसांनी उंबरांडी शिवारातून जमिनीतून अक्षयचा मृतदेह बाहेर काढून ताब्यात घेतला असून, नराधम भोंदूबाबा योगेश खैरनार याला बेड्या ठोकल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *