महापालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर प्रशासन सकारात्मक…

पिंपरी चिंचवड (दि. ०७ ऑगस्ट २०२६/pragatbharat.com) :- पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने दिलेल्या संप नोटिशीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत (बबनराव) झिंजुर्डे, संघटनेचे पदाधिकारी आणि विभागप्रमुख उपस्थित होते.

बैठकीत सर्व पात्र अधिकारी-कर्मचाऱ्यांना रु. २५ हजार सानुग्रह अनुदान आणि ८.३३ टक्के बोनस पुढील पाच वर्षांसाठी देण्याबाबतचा करार आठ दिवसांत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. सेवा प्रवेश नियमावली अंतिम करून एका महिन्यात शासनाकडे मंजुरीसाठी पाठविणे, जुनी पेन्शन योजनेबाबत समिती स्थापन करणे तसेच आरोग्य विभागातील २५ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या पात्र कर्मचाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत मोफत घरे उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेण्यात आली.

याशिवाय कर्मचारी महासंघाने मांडलेल्या इतर २८ मागण्यांवरही लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. बैठकीतील निर्णयांचे अधिकृत सभावृत्त मिळाल्यानंतर महासंघ सर्व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून ३१ जुलै रोजी दिलेल्या संप नोटिशीबाबत पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *