मोशी दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना कंपनीकडून ४० लाखांची मदत..

मोशी दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना कंपनीकडून ४० लाखांची मदत..
  • मुलांचे शिक्षण, वैद्यकीय विमा आणि कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचीही ग्वाही…

पिंपरी चिंचवड (दि. १० ऑगस्ट २०२६ pragatbharat.com) :- मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ९ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ऍन्टोनी लारा रिन्युएबल्स कंपनीच्या वतीने प्रत्येकी ४० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे मान्य करण्यात आले आहे. याशिवाय मृत कर्मचाऱ्यांच्या मुलांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च, कुटुंबीयांचा वैद्यकीय विमा आणि प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची ग्वाही कंपनीने दिली आहे.

याबाबत सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. सध्या महापालिकेच्या वतीने प्रत्येकी १० लाख आणि कंपनीच्या वतीने प्रत्येकी १० लाख, अशी २० लाख रुपयांची मदत कुटुंबीयांना मिळाली आहे. कंपनीकडून उर्वरित २० लाख रुपयांची मदत येत्या काही दिवसांत देण्यात येणार आहे.

महापालिकेच्या वतीने मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाखांची मदत देण्यात आली असून, आवश्यक कागदपत्रांअभावी दोन कुटुंबांना अद्याप मदत मिळालेली नाही. कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना लवकर मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तसेच मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या मागणीनुसार महापालिकेच्या सेवेत नोकरी आणि घरकुल योजनेतून निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शितोळे यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाकडूनही प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *