पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्वीडन दौऱ्यावर; युरोपियन युनियनसोबतच्या मुक्त व्यापार करारानंतरचा पहिलाच दौरा, भारत-नेदरलँड्स धोरणात्मक भागीदारीवर शिक्कामोर्तब

गॉटेनबर्ग/नवी दिल्ली (pragatbharat.com) : भारत आणि स्वीडन यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये एक नवा ऐतिहासिक टप्पा गाठण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर स्वीडनमधील गॉटेनबर्ग येथे पोहोचत आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन (Ulf Kristersson) यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या उच्चस्तरीय बैठकीत व्यापार, हरित संक्रमण (Green Transition), आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI), उदयोन्मुख तंत्रज्ञान, स्टार्टअप्स, लवचिक पुरवठा साखळी, संरक्षण, अंतराळ, हवामान कृती आणि दोन्ही देशांमधील लोक-ते-लोक संबंध यांवर सविस्तर आढावा घेतला जाईल.

युरोपियन राऊंड टेबलमध्ये सहभाग; व्यापार वाढीवर भर: दोन्ही देशांचे पंतप्रधान युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन (Ursula von der Leyen) यांच्या उपस्थितीत ‘युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्री’ला संबोधित करणार आहेत. जानेवारी २०२६ मध्ये भारत-ईयू मुक्त व्यापार करार (India-EU Free Trade Agreement) लागू झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच युरोप दौरा आहे. भारत आणि स्वीडन यांच्यातील द्विपक्षीय व्यापार २०२५ मध्ये विक्रमी ७.७५ अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला आहे, तर २००० ते २०२५ दरम्यान भारतात स्वीडिश गुंतवणूक २.८ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाली आहे.

भारत आणि नेदरलँड्समध्ये धोरणात्मक भागीदारी मजबूत: स्वीडन दौऱ्यापूर्वी, पंतप्रधान मोदी यांच्या युरोप दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात भारत आणि नेदरलँड्स यांनी आपले द्विपक्षीय संबंध ‘धोरणात्मक भागीदारी’ (Strategic Partnership) पातळीवर नेण्याचे मान्य केले आहे. द हेग (The Hague) येथे पंतप्रधान मोदी आणि डच पंतप्रधान रॉब जेटन (Rob Jetten) यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. दोन्ही नेत्यांनी व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान, जलव्यवस्थापन, स्वच्छ ऊर्जा, आरोग्य सेवा आणि शिक्षण या क्षेत्रांतील सहकार्याचा आढावा घेतला असून अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी नेदरलँड्सचा उल्लेख भारताचा प्रमुख युरोपियन भागीदार म्हणून केला आणि सांगितले की, हे संबंध सामायिक लोकशाही मूल्ये आणि मजबूत आर्थिक संबंधांवर आधारित आहेत. डच तंत्रज्ञान आणि भारताची गती यांचा मेळ घालून उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये अधिक सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. तर डच पंतप्रधान रॉब जेटन यांनी भारतासोबतच्या वाढत्या आर्थिक आणि धोरणात्मक महत्त्वावर विशेष भर दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *