
चेन्नई/मुंबई (pragatbharat.com) : तमिळ चित्रपटसृष्टीतील (Kollywood) ज्येष्ठ आणि अत्यंत प्रभावी दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते के. राजन यांनी चेन्नई येथील पुलावरून नदीत उडी मारून आपले आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांच्या या अकस्मात आणि अत्यंत टोकाच्या पावलामुळे संपूर्ण दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह भारतीय कलाविश्वाला मोठा धक्का बसला असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. ते ८५ वर्षांचे होते.
“जरा फिरून येतो” म्हटले अन् नदीत उडी मारली: मिळालेल्या माहितीनुसार, के. राजन हे गेल्या काही काळापासून त्यांच्या कुटुंबीयांपासून दूर चेन्नईत एकटेच राहत होते. घटनेच्या दिवशी ते वॉशरमॅनपेट येथून कारने निघाले होते आणि त्यांच्यासोबत त्यांचा ड्रायव्हरही होता. जेव्हा त्यांची कार अड्यार नदीवर बनलेल्या पुलाजवळ पोहोचली, तेव्हा त्यांनी ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास सांगितली. “थोडे चालून येतो,” असे म्हणून ते कारमधून उतरले आणि काही क्षणांतच त्यांनी पुलावरून थेट नदीत उडी मारली. ड्रायव्हरने तात्काळ मदतीसाठी आरडाओरडा केला. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. पोलिसांनी त्यांचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
तमिळ सिनेसृष्टीतील एक प्रभावी आणि हक्काचा आवाज: के. राजन हे तमिळ चित्रपटसृष्टीतील एक अतिशय सन्माननीय आणि वजनदार व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी १९८३ मध्ये ‘ब्रह्मचारिगल’ या चित्रपटाद्वारे निर्माता म्हणून आपल्या यशस्वी कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन आणि अभिनय केला. तमिळ चित्रपट निर्माते परिषदेच्या निवडणुकीतही ते नेहमी सक्रिय असायचे. सिनेसृष्टीत जेव्हा कधी मोठे वाद किंवा समस्या निर्माण होत, तेव्हा ते नेहमीच मध्यस्थी करून सलोखा घडवून आणण्यासाठी पुढाकार घेत असत.
स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच राहिले चर्चेत: के. राजन हे त्यांच्या निर्भय आणि स्पष्टवक्ते स्वभावासाठी ओळखले जायचे. मोठ्या कलाकारांच्या अवाजवी मानधनावर आणि महागड्या बजेटच्या चित्रपटांवर त्यांनी नेहमीच उघडपणे टीका केली. नयनतारासारख्या मोठ्या अभिनेत्रींच्या कोट्यवधींच्या मानधनावर त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. मोठे कलाकार चित्रपट प्रमोशनला येत नाहीत आणि भरमसाठ मानधन घेतात, ज्यामुळे निर्माते कर्जाच्या बोज्याखाली दबले जातात, असा स्पष्ट युक्तिवाद त्यांनी कार्तीच्या ‘आयिरथिल ओरुवन’ आणि धनुषच्या ‘एनाई नोकी पायूम थोटा’ या चित्रपटांचे उदाहरण देत केला होता. सध्या पोलीस त्यांच्या ड्रायव्हरची चौकशी करून आत्महत्येच्या नेमक्या कारणाचा शोध घेत आहेत.

