पुणे हादरलं! चारित्र्याचा संशय आणि वंशाच्या दिव्यासाठी पत्नीच्या गुप्तांगावर ओतलं ॲसिड; १५ दिवस घरात डांबून छळणारा क्रूर पती पोलिसांच्या ताब्यात

पुणे (pragatbharat.com) : पुण्याच्या उरुळी कांचन परिसरातून माणुसकीला काळिमा फासणारी आणि क्रूरतेचा कळस गाठणारी एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. चारित्र्याचा संशय आणि ‘मुलगा होत नाही’ याच विळख्यातून एका नराधम पतीने आपल्या २४ वर्षीय पत्नीवर अमानुष अत्याचार केले. या नराधमाने पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड ओतून, असह्य वेदनेने विव्हळत असतानाही तिला तब्बल १५ दिवस घरातच कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मद्यधुंद अवस्थेत अमानुष कृत्य; लाथाबुक्क्यांनी मारहाण: मिळालेल्या माहितीनुसार, ही थरारक घटना २० एप्रिल रोजी घडली. पीडितेचा पती मद्यधुंद अवस्थेत घरी आला आणि “तू कामासाठी बाहेर जातेस, तुझे कोणाशी संबंध आहेत ते सांग,” असे म्हणत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत बेदम मारहाण करू लागला. वाद विकोपाला गेल्यानंतर त्याने घरात असलेली ॲसिडची बाटली आणून तिच्या गुप्तांगावर ओतली. असह्य वेदनेने महिला ओरडत असताना आणि जीव वाचवण्यासाठी पळत असताना, या क्रूर पतीने घराचा दरवाजा आतून बंद केला आणि तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घराबाहेर पडण्यास मज्जाव केला.

१५ दिवस नरकयातना; चिमुरड्यांसह काढला पळ: “माझ्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत,” असे निर्लज्ज कारण सांगत आरोपीने गंभीर जखमी पत्नीला रुग्णालयात नेण्यास स्पष्ट नकार दिला. कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन तिला १५ दिवस त्याच विव्हळत असलेल्या अवस्थेत घरात डांबून ठेवले. अखेर, शनिवारी (९ मे) पती कामावर गेल्याची संधी साधून पीडितेने आपल्या दोन चिमुरड्या मुलींसह घरातून कशीबशी सुटका करून घेतली आणि थेट माहेर गाठले. माहेरी पोहोचून आपबीती सांगितल्यानंतर नातेवाईकांनी तिला तात्काळ पोलीस ठाण्यात आणले.

ससून रुग्णालयात उपचार सुरू; पोलिसांकडून गुन्हा दाखल: उरुळी कांचन पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पीडितेला तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) उपचारासाठी दाखल केले असून तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. पीडितेने दिलेल्या जबाबदार तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील बारकाईने तपास केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *