
मुंबई (pragatbharat.com) : बीड जिल्ह्यातील परळी येथील शिवभक्तांसाठी आणि नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. परळी येथील पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास अखेर ३०१.५४ कोटी रुपयांची सुधारित मंजुरी देण्यात आली आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर संपन्न झालेल्या राज्य सरकारच्या शिखर समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या मंजुरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे विशेष आभार मानले.
विकास आराखड्यात मोठी वाढ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीत परळी वैद्यनाथ मंदिर आणि परिसर विकासाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. आधीच्या आराखड्यात वाढ करून आता ३०१.५४ कोटी रुपयांचा सुधारित निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसर, भाविकांसाठीच्या मूलभूत सोयी-सुविधा आणि परळी शहराच्या सुशोभीकरणाला मोठी गती मिळणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री गणेश नाईक, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. धनंजय मुंडे यांनी संपूर्ण परळीवासीयांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली.
सुनील तटकरेंच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तटकरे यांच्या भेटीचे अधिकृत कारण अद्याप समोर आले नसले, तरी महायुतीमधील अंतर्गत घडामोडी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला प्रचंड राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
काही दिवसांपूर्वीच पार्थ पवार यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, आणि आता एकापाठोपाठ एक राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट यामुळे राजकीय समीक्षकांच्या भुवया उंचावल्या असून महायुतीत काही वेगळ्या घडामोडी सुरू आहेत का, अशी चर्चा रंगू लागली आहे.

