
नाशिक (pragatbharat.com) : महाराष्ट्र राज्यातील ९ सदस्यांची विधानसभेतून निवड झाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या १६ जागांसाठी अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, सर्वांचे लक्ष नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या एका जागेकडे लागले आहे. या जागेवर सत्ताधारी महायुतीमधील मित्रपक्ष असलेले भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे दोन्ही पक्ष आमने-सामने येण्याची चिन्हे आहेत. या एका जागेसाठी दोन्ही पक्षांकडून तब्बल ५ प्रबळ दावेदार रिंगणात असल्याने महायुतीत मोठी चुरस पाहायला मिळत आहे.
मतदारांचे गणित आणि कोणाचा दावा किती मजबूत? नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी एकूण ६२३ मतदार (स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी) आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पक्षीय पातळीवर सर्वाधिक १९० मतदार एकट्या भाजपकडे आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची १७१ मते आहेत. भाजपकडे सर्वाधिक संख्याबळ असल्याने या जागेवर आपलाच हक्क असल्याचा दावा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे. मात्र, “ज्या जागांवर यापूर्वी शिवसेनेचे आमदार निवडून आले होते, तिथे शिवसेनाच दावा करणार. नाशिकमध्ये आमचा आमदार असल्याने ही जागा शिवसेनेचीच आहे,” असे शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केल्याने पेच वाढला आहे. २०१८ च्या निवडणुकीत येथून शिवसेनेचे नरेंद्र दराडे निवडून आले होते.
भाजप आणि शिवसेनेतील प्रमुख दावेदार:
- भारतीय जनता पक्ष (BJP): भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि महापालिका निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारे निलेश बोरा हे भाजपकडून सर्वात प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यांच्या सोबतीने भाजपचे गणेश गीते यांचेही नाव चर्चेत आहे.
- शिवसेना (एकनाथ शिंदे गट): शिवसेनेकडून आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुम कांदे यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. याशिवाय पक्षाचे निष्ठावंत नेते अजय बोरस्ते आणि भाऊ चौधरी यांच्या नावाचीही पक्षात जोरदार चर्चा सुरू आहे.
मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता आणि विधान परिषदेचे बलाबल: महायुतीमधील दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये या जागेवरून एकमत न झाल्यास, ऐनवेळी भाजप आणि शिंदे सेना येथे ‘मैत्रीपूर्ण लढत’ (Friendly Fight) देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या एकूण ७८ जागांपैकी ३० सदस्य विधानसभेचे आमदार निवडतात, तर २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडले जातात. उर्वरित जागा पदवीधर, शिक्षक आणि राज्यपाल नियुक्त आमदारांच्या असतात. नाशिकमधील या जागेवर महायुती अंतर्गत नेमकी कोणाला संधी मिळते, याकडे आता संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


