पुण्यात नवले ब्रिजवर भरदिवसा रिक्षाचालकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; व्हिडिओ व्हायरल, तिघांना अटक

पुणे (pragatbharat.com) : पुण्यातील कात्रज चौक ते नवले ब्रिज हायवेवरील राजमाता भुयारी मार्गाजवळील दत्तनगर चौकात भरदिवसा एका रिक्षाचालकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. १८ मे २०२६ रोजी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, यामुळे पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

रिक्षा स्टँडच्या वर्चस्वावरून जुनी दुश्मनी: पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज काळे असे जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. सूरज आणि हल्ला करणाऱ्या अन्य तीन रिक्षाचालकांमध्ये गेल्या दोन ते तीन वर्षांपासून वाद सुरू होते. रिक्षा स्टँडवर प्रवासी बसवणे आणि स्टँडमधील वर्चस्व यावरून त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. याच जुन्या वैमनस्यातून आरोपींनी १८ मे रोजी सकाळी सूरज याला दत्तनगर चौकात एकटे गाठून घेरले आणि त्याच्यावर धारदार कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात सूरज गंभीर जखमी होऊन रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत त्याला रुग्णालयात दाखल केले असून, सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

आंबेगाव पोलिसांकडून तिघांना तात्काळ अटक: या सनसनाटी गुन्ह्याची दखल घेत आंबेगाव पोलिसांनी तत्परता दाखवून अवघ्या काही तासांतच तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे बाळासाहेब भोसले (वय ३५, रा. वेल्हा, जि. पुणे), गणेश हरिभाऊ धारपाले (वय २७, रा. भोर, जि. पुणे) आणि गणेश ऊर्फ भावड्या हरिभाऊ धरपाळे (वय ३६, रा. आंबेगाव पठार, पुणे) अशी आहेत. हे सर्व आरोपी पुण्यातील वेगवेगळ्या भागातील रहिवासी असून त्यांच्यावर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित पवारांची सरकारवर टीका: दरम्यान, भररस्त्यात घडलेल्या या हिंसक घटनेचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. “पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघत आहेत,” अशी तीव्र टीका करत रोहित पवार यांनी थेट सरकारला आणि गृहविभागाला जाब विचारला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नवले ब्रिज आणि कात्रज परिसरातील नागरिकांमध्ये व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *