
पुणे (pragatbharat.com) : पुणे शहरातील नाना पेठेतील वर्चस्वाच्या लढाईतून सुरू असलेले आंदेकर आणि कोमकर टोळीतील हिंसक युद्ध संपण्याचे नाव घेत नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येला दोन वर्षे उलटत आले असतानाच, या गँगवॉरचा दुसरा अंक पुण्यात उघडकीस आला आहे. वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपीच्या सख्ख्या भावाची भर दिवसा, भर रस्त्यावर गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पुण्यातील बाळाजी नगर परिसरातील बस स्टँड चौकात हा थरार घडला असून या घटनेमुळे संपूर्ण शहरात तीव्र खळबळ उडाली आहे.
चौथ्या हत्येने बाळाजी नगर हादरले: टोळीयुद्धातून हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव अक्षय ऊर्फ बाळा म्हस्के असे आहे. आंदेकर आणि कोमकर टोळीच्या वर्चस्वाच्या लढाईतील ही चौथी हत्या असल्याचे समोर आले आहे. दोन वर्षांपूर्वी नाना पेठेतील डोके तालीम समोर वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडून आणि कोयत्याने सपासप वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात पुणे पोलिसांनी आंदेकर यांच्या दोन सख्ख्या बहिणी आणि दोन मेहुण्यांसह कोमकर-म्हस्के टोळीतील टोळीप्रमुखांना अटक केली होती. तेव्हापासून आंदेकर टोळी या हत्येचा बदला घेण्याच्या प्रयत्नात होती आणि याच वैमनस्यातून अक्षय म्हस्के याला बाळाजी नगर चौकात गाठून त्याचा काटा काढण्यात आला.
नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण: भर दिवसा आणि वर्दळीच्या बस स्टँड परिसरात गोळीबार झाल्याने घटनास्थळी एकच पळापळ झाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने अक्षयवर पाळत ठेवून हा हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. आंदेकर कुटुंबातील प्रमुख सदस्य सध्या जेलमध्ये असले, तरी त्यांच्या टोळीच्या सक्रिय गुंडांनी हा गेम केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँग आणि रिक्षाचालकांवरील हल्ल्याच्या घटना ताज्या असतानाच, थेट भरचौकातील या टोळीयुद्धाने पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा वचक उरला आहे की नाही, असा सवाल पुणेकर नागरिक विचारत आहेत. पोलिसांनी या परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला असून, हल्लेखोरांच्या शोधासाठी गुन्हे शाखेची (Crime Branch) वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली आहेत.

