
मुंबई (pragatbharat.com) : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक दिग्गज अभिनेत्रींनी स्क्रीन शेअर केली आहे. परंतु, ‘सूर्यवंशम’ या अजरामर चित्रपटातील ठाकूर भानूप्रताप सिंह यांच्या सूनबाई म्हणजेच ‘राधा’ची भूमिका साकारणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्री सौंदर्या (Soundarya) हिने हिंदी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. सौंदर्याच्या अभिनयाची आणि सौंदर्याची चर्चा आजही सोशल मीडियावर रंगलेली असते. परंतु, वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी आणि ७ महिन्यांची गर्भवती असताना एका भीषण विमान अपघातात तिचा झालेला दुर्दैवी अंत आजही चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आणतो.
‘सूर्यवंशम’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक पदार्पण: सौंदर्याने १९९९ मध्ये रिलीज झालेल्या ‘सूर्यवंशम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा तिचा पहिला आणि एकमेव हिंदी चित्रपट ठरला. आजही जेव्हा जेव्हा हा चित्रपट टीव्हीवर दाखवला जातो, तेव्हा प्रेक्षकांना तिची प्रकर्षाने आठवण येते. हिंदीत केवळ एकच सिनेमा केला असला, तरी साऊथ चित्रपटसृष्टीत तिचे नाव फार मोठे होते. तिने कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेतील अनेक सुपरहीट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या.
संसार फुलण्यापूर्वीच काळाचा घाला: सौंदर्याने वर्ष २००३ मध्ये तिच्या बालपणीचा मित्र आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर जीएस रघू यांच्याशी विवाह केला होता. लग्नानंतर काही महिन्यांतच त्यांच्या घरी पाळणा हलणार होता. मात्र, तिचा सुखी संसार फुलण्यापूर्वीच काळाने तिच्यावर घाला घातला. १७ एप्रिल २००४ रोजी सौंदर्याने भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला होता. पक्षाच्या प्रचारासाठी ती एका खाजगी विमानाने तेलंगणामधील करीमनगरकडे प्रवास करत होती. बंगळुरूच्या जक्कूर धावपट्टीवरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच विमानाला अपघात झाला.
मॄतदेहही हाती लागला नाही, असा भीषण अपघात: हा विमान अपघात इतका भीषण आणि भयानक होता की, विमानाने पेट घेतला. या दुर्घटनेत सौंदर्या, तिचा भाऊ अमरनाथ आणि इतर दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की कुटुंबियांना सौंदर्याचा मॄतदेह ओळखणेही कठीण झाले होते. ती ७ महिन्यांची गर्भवती असल्याने या अपघातात एका न जन्माला आलेल्या बाळाचाही अंत झाला. तिच्या या अकाली आणि हृदयद्रावक निधनाने संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टी आणि करोडो चाहते आजही हळहळतात.

