
मुंबई (pragatbharat.com) : आयपीएल २०२६ (IPL 2026) मधून आधीच बाहेर पडलेल्या मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्यावर कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या (KKR) सामन्यादरम्यान आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी बीसीसीआयने (BCCI) मोठी कारवाई केली आहे. खेळाडू आणि संघ अधिकाऱ्यांसाठी लागू असलेल्या आचारसंहितेच्या लेव्हल-१ (Level-1) उल्लंघनासाठी हार्दिकच्या मॅच फीपैकी १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. यासोबतच त्याच्या शिस्तभंग खात्यात एक डिमेरिट पॉईंटही (Demerit Point) जमा करण्यात आला आहे.
विकेटच्या बेल्स फेकल्या; कॅमेऱ्यात कैद झाली चूक: बीसीसीआयने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, हार्दिक पांड्याने आयपीएल आचारसंहितेतील कलम २.२ चे उल्लंघन केले आहे. हे कलम सामन्यादरम्यान क्रिकेटचे साहित्य, मैदानावरील उपकरणे किंवा फिक्स्चरचा गैरवापर करण्यासंदर्भात लागू होते. कोलकाताविरुद्धच्या सामन्यात खराब क्षेत्ररक्षणामुळे संतापलेल्या हार्दिकने आपल्या रन-अपने परत जाताना विकेटच्या बेल्सवर (Bails) जोरात हात मारून त्या फेकून दिल्या होत्या. हार्दिकने आपली ही चूक मान्य केली असून मॅच रेफरीने दिलेली शिक्षा आणि दंड स्वीकारला आहे.
नेमकं काय घडलं होतं मैदानावर? कोलकाता नाइट रायडर्सच्या डावातील १० व्या षटकात मुंबईच्या क्षेत्ररक्षकांमध्ये मोठा गोंधळ उडाला. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर केकेआरच्या रोव्हमन पॉवेलने हवेत फटका मारला. डीप बैकवर्ड स्क्वेअर लेगवर हा अत्यंत सोपा झेल होता. मात्र, दीपक चहर आणि रॉबिन मिन्झ यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे हा झेल सुटला. चहरने हा झेल घेण्याचा प्रयत्नच केला नाही. या जीवनदानाचा फायदा घेत लगेचच मनीष पांडेने सलग दोन चौकार ठोकले. झेल सुटणे आणि सलग चौकार जाणे यामुळे कर्णधार हार्दिक पांड्याचा संयम सुटला आणि त्याने रागाच्या भरात बेल्स पाडल्या.
कोलकाता नाईट रायडर्सचा ४ विकेट्सनी विजय: या सामन्यात मुंबई इंडियन्सची टॉप ऑर्डर पुन्हा एकदा पत्त्यासारखी कोसळली. रायन रिकल्टन (६), रोहित शर्मा (१५), सूर्यकुमार यादव (१५) आणि नमन धीर (०) झटपट बाद झाले. टिळक वर्माच्या २० आणि हार्दिक पांड्याच्या २६ धावांनंतर अखेरीस कॉर्बिन बॉशने १८ चेंडूत ३२ धावांची खेळी केल्यामुळे मुंबईला १.४७ धावांपर्यंत पोहोचता आले. १४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरकडून मनीष पांडेने ४५ धावांची मॅचविनिंग खेळी केली, ज्यासाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाला. रोव्हमन पॉवेलने ४० धावांचे योगदान दिले. अखेर कोलकात्याने ७ चेंडू राखून ४ विकेट्सनी हा सामना जिंकला.

