पालघरमध्ये खळबळ! अनैतिक संबंधातून गुजरातच्या तरुणाची हत्या; पती-पत्नीला पोलिसांकडून अटक

पालघर/तलासरी (pragatbharat.com) : अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका ३३ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यात समोर आली आहे. याप्रकरणी तलासरी पोलिसांनी एका दाम्पत्याला अटक केली आहे. हत्येचा हा कट रचून पीडित तरुणाला गुजरातवरून पालघरमधील एका निर्जन स्थळी बोलावून घेण्यात आले होते.

कुर्जे धरणाजवळ थरार: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतनेशभाई राजन माच्छी (वय ३३, रा. वलसाड, गुजरात) असे मृत तरुणाचे नाव आहे. २० मे रोजी त्याचा मृतदेह गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्यानंतर तलासरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजय गोरहाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. संशयावरून पोलिसांनी जेरी बाबू माच्छी (वय ३६) याला ताब्यात घेतले असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. प्राथमिक तपासानुसार, मृत अतनेशभाई आणि जेरीच्या ३२ वर्षीय पत्नीमध्ये प्रेमसंबंध होते.

दारू पाजून केला हल्ला: अनैतिक संबंधांमुळे आरोपी पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत असत. अखेर या त्रासाला कंटाळून त्यांनी अतनेशभाईचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. कटानुसार, त्यांनी अतनेशभाईला पालघरमधील कुर्जे धरणाजवळील एका निर्जन भागात भेटायला बोलावले. तिथे त्याला आधी मोठ्या प्रमाणात दारू पाजण्यात आली. अतनेशभाई पूर्णपणे नशेत धुंद झाल्यानंतर दोघांनी मिळून त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याला जागीच ठार केले.

आरोपी गजाआड: या गुन्ह्यात वापरलेले शस्त्र आणि इतर पुरावे गोळा करण्याचे काम पोलीस करत असून, पती आणि पत्नी दोघांनाही अटक करण्यात आली आहे. तलासरी पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *