
मुंबई/बायकुळा (pragatbharat.com) : डेटिंग ॲप ‘बंबल’ (Bumble) वर झालेल्या एका ओळखीचे रुपांतर शेवटी तब्बल २१.५० लाख रुपयांच्या सायबर फसवणुकीत झाल्याची धक्कादायक घटना मुंबईत समोर आली आहे. बायकुळा येथील एका ३८ वर्षीय इंटिरियर डिझायनरला लग्नासाठी मुलगी शोधत असताना एका तरुणीने जाळ्यात ओढले आणि ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली लाखो रुपयांचा गंडा घातला.
अशी झाली ओळख आणि फसवणूक: पीडित व्यवसायिकाने दोन वर्षांपूर्वी बंबलवर प्रोफाईल तयार केले होते. २५ मार्च रोजी त्याची ओळख स्वतःचे नाव ‘अनन्या शर्मा’ सांगणाऱ्या एका ३६ वर्षीय महिलेशी झाली. सुरुवातीला बंबल, नंतर टेलिग्राम आणि शेवटी व्हॉट्सॲपवर त्यांच्यात चॅटिंग आणि फोनवर बोलणे सुरू झाले. काही दिवसांतच महिलेने त्याचा विश्वास संपादन केला आणि ‘डार्विनेक्स’ (Darwinex) नावाच्या कंपनीशी संबंधित एका ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक केल्यास मोठा नफा होईल, असे आमिष दाखवले.
अन् ६९ लाखांचा खोटा नफा दाखवला: महिलेला विश्वासू मानून पीडिताने १ एप्रिल रोजी सुरुवातीला ५०,००० रुपये ट्रान्सफर केले, जे ट्रेडिंग डॅशबोर्डवर दिसू लागले. विश्वास वाढल्याने त्याने ६ एप्रिल रोजी १० लाख आणि २० एप्रिल रोजी आणखी ११ लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात पाठवले. अशा प्रकारे त्याने एकूण २१.५ लाख रुपयांची गुंतवणूक केली. काही दिवसांनी त्या प्लॅटफॉर्मवर त्याचा नफा तब्बल ७६,८४८ डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे ६९ लाख रुपये दाखवण्यात आला.
३० टक्के टॅक्सच्या मागणीमुळे भांडे फुटले: जेव्हा पीडित तरुणाने हा नफा काढून घेण्याचा (Withdraw) प्रयत्न केला, तेंव्हा त्याला सांगण्यात आले की पैसे काढण्यापूर्वी नफ्यावर ३० टक्के टॅक्स भरावा लागेल. वारंवार पैसे मागूनही आरोपी टाळाटाळ करू लागले आणि आणखी पैशांची मागणी करू लागले, तेव्हा आपल्याला फसवले गेल्याचे त्याच्या लक्षात आले. याप्रकरणी पीडिताने मध्यवर्ती विभागाच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस या प्रकरणाचा डिजिटल मार्ग आणि बँक खात्यांचा माग काढून पुढील तपास करत आहेत.

