
चंद्रपूर (pragatbharat.com) : आगामी विधान परिषदेच्या चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे (Chandrapur Vidhan Parishad Election 2026) पूर्व विदर्भातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. अद्याप उमेदवारांची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर ‘घोडेबाजार’ सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काँग्रेसचे (Congress) जवळपास ४० नगरसेवक अचानक पर्यटनासाठी रवाना झाले असून, त्यांना भारतीय जनता पक्षाकडून (BJP) सहलीवर पाठवण्यात आल्याचा खळबळजनक दावा सूत्रांकडून केला जात आहे.
५ लाखांचे टोकन अन् ‘लक्ष्मीदर्शन’ची चर्चा: राजकीय वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या पर्यटनासाठी गेलेल्या या ४० नगरसेवकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे ‘टोकन’ देण्यात आले असून, प्रत्यक्ष मतदानापर्यंत हा आकडा तब्बल १५ लाख रुपयांपर्यंत (लक्ष्मीदर्शन) जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सहलीमध्ये सिंदेवाही नगरपंचायतीचे ४, सावली नगरपंचायतीचे ५, नागभीड नगरपरिषदेचे ५ नगरसेवकांसह कोरपना, कुरखेडा आणि कोरची या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. सत्ताधाऱ्यांनी या निवडणुकीत काँग्रेसचे तब्बल ८० नगरसेवक फोडण्याचे टार्गेट ठेवल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
फडणवीसांच्या निकटवर्तीयावर खास जबाबदारी: मागच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपकडे स्पष्ट बहुमत असतानाही भाजपचे उमेदवार डॉ. रामदास आंबटकर हे अगदी काठावरच्या बहुमताने विजयी झाले होते. यंदा महायुतीकडे बहुमत असले तरी ते केवळ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे कोणताही धोका न पत्करता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील एका भाजप आमदारावर या संपूर्ण मोर्चेबांधणीची आणि नगरसेवकांच्या ‘व्यवस्थापनाची’ विशेष जबाबदारी सोपवण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे.
मतदारसंघातील पक्षीय बलाबल (Total Voters: ९७७): या तिन्ही जिल्ह्यांत सध्या जिल्हा परिषदेची निर्वाचित बॉडी अस्तित्वात नसल्यामुळे केवळ महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींचे सदस्यच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
- महायुती (एकूण ४४५): भाजप – ३४१, शिवसेना (शिंदे गट) – ३९, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – ६३, रिपाइं (आठवले) – २.
- महाविकास आघाडी (एकूण ३५१): काँग्रेस – २९३, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – ३३, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – २५.
- अपक्ष आणि इतर: ९१ मते.
ही निवडणूक बिनविरोध व्हावी – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे: या संपूर्ण वादावर प्रतिक्रिया देताना राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचा या पळवापळवीशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, “काँग्रेसचे नगरसेवक कुठे गेले, हा त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे. नागपूर आणि इतर ठिकाणी भाजपकडे मोठे संख्याबळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इंधन वाचवा’ असे आवाहन केले आहे. निवडणुकीच्या प्रचारात मोठ्या प्रमाणावर डिझेल-पेट्रोल लागते, त्यामुळे संख्याबळ नसल्यास ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती मी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना केली आहे.” मात्र, महायुती राज्यातील सर्व १७ जागा जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विधान परिषद निवडणूक कार्यक्रम २०२६ (महत्त्वाच्या तारखा):
- अधिसूचना जारी: २५ मे २०२६
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख: १ जून २०२६
- अर्ज माघारीची अंतिम तारीख: ४ जून २०२६
- मतदान: १८ जून २०२६ (सकाळी ८ ते दुपारी ४)
- मतमोजणी व निकाल: २२ जून २०२६


