मेघराज भोसलेंचा विजय पाटकरांवर पलटवार; “अभिनेता म्हणून चांगला, पण माणूस म्हणून…”

मुंबई (pragatbharat.com) : एकीकडे राज्यातील विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू असतानाच, दुसरीकडे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या (Chitrapat Mahamandal Election 2026) निवडणुकीतही कमालीची चुरस आणि आरोप-प्रत्यारोपांचे नाट्य रंगले आहे. ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर आणि माजी अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यातील वाद आता थेट चव्हाट्यावर आला आहे. “विजय पाटकर यांनी माझ्यावर अनेक खोटे आरोप लावले आहेत. अभिनेता म्हणून हा माणूस चांगला आहे, पण माणूस म्हणून ते किती खालच्या पातळीचे आहेत, हे त्यांनी आज आपल्या वक्तव्यातून दाखवून दिले,” अशा अत्यंत तिखट शब्दांत मेघराज भोसले यांनी पलटवार केला आहे.

नेमका वाद काय आहे? चित्रपट महामंडळाच्या निवडणूक प्रक्रियेत राजकारण करून आपल्याला उमेदवारी अर्ज भरू दिला गेला नाही, असा खळबळजनक आरोप अभिनेते विजय पाटकर यांनी केला होता. आपण कोल्हापूरला आपला अर्ज पाठवला होता, मात्र सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे तो नाकारण्यात आल्याचे पाटकरांचे म्हणणे होते. या मुद्द्यावरून राजकीय आणि कला वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मेघराज भोसले यांनी दिलेले स्पष्टीकरण: विजय पाटकरांच्या आरोपांना पूर्णपणे फेटाळून लावत मेघराज भोसले यांनी पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली. त्यांच्या पलटवारातील मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे:

  • कोणाचाही दबाव नाही: “पाटकर यांना निवडणुकीचा फॉर्म भरायला कोणी अडवले होते? कोणत्या तरी मंत्र्यांच्या ओएसडीचा (OSD) दबाव होता, हे त्यांचे म्हणणे निव्वळ खोटे आहे. मी स्वतः त्यांना एकत्र निवडणूक लढवण्यासाठी फोन केला होता, पण त्यांना वाटले की मी निवडणुकीला घाबरलो आहे.”
  • कामांची तुलना: भोसले पुढे म्हणाले, “मी गेली ५ वर्षे अध्यक्ष असताना महामंडळात जेवढी ऐतिहासिक कामे झाली, तेवढी गेल्या ५५ वर्षांत झाली नव्हती. विजय पाटकर जेव्हा अध्यक्ष होते, तेव्हा त्यांनी स्वतःसाठी फक्त चित्रपट मिळवले, महामंडळासाठी काहीही केले नाही.”
  • भ्रष्टाचाराचे आरोप: माझ्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध झालेला नाही. याउलट २०१४ ते २०१६ या काळात अध्यक्ष असताना स्वतः पाटकरांवरच भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते आणि म्हणूनच त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले होते, असा गंभीर आरोपही भोसलेंनी केला.

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा संताप: या संपूर्ण प्रकरणात आता राजकीय नेत्यांनी उडी घेतली असून काँग्रेसच्या नेत्या तथा माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. “एका ज्येष्ठ कलाकाराला अर्ज भरण्यापासून रोखणे अत्यंत गंभीर आहे. एका मंत्र्याचा ओएसडी कोल्हापुरात बसून ही निवडणूक मॅनेज करत आहे. साम, दाम, दंड, भेद वापरून चित्रपट महामंडळातही ही घातक प्रवृत्ती घुसत असेल, तर लोकशाही आणि कला क्षेत्रासाठी हे अत्यंत चिंताजनक आहे,” असे म्हणत त्यांनी मराठी कलाकारांना या प्रवृत्तीविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे.

कला क्षेत्रात सुरू असलेला हा अंतर्गत वाद आता पूर्णपणे राजकीय वळण घेताना दिसत असून, आगामी काळात चित्रपट महामंडळाची ही निवडणूक अधिकच गाजणार यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *