पुण्याची कुविख्यात आंदेकर टोळी अहिल्यानगरात दरोडा टाकण्याच्या तयारीत; पोलिसांनी रचला सापळा, ४ पिस्तुल व कोयत्यासह ५ गुंडांना अटक

अहिल्यानगर (pragatbharat.com) : पुणे शहरात आपल्या गुन्हेगारी कृत्यांनी दहशत माजवणारी कुविख्यात आंदेकर टोळी आता इतर जिल्ह्यांमध्येही आपले पाय पसरत असल्याचे एक अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पोलिसांनी एका गुप्त मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करत आंदेकर टोळीच्या ५ सराईत गुंडांना अटक केली आहे. शहरालगत असलेल्या प्रसिद्ध मिरावली पहाडच्या पायथ्याशी पोलिसांनी ही कारवाई केली असून, हे गुंड एका मोठ्या दरोड्याच्या तयारीत होते, अशी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंदेकर टोळीचे काही सदस्य अहिल्यानगर परिसरात शस्त्रास्त्रांसह फिरत असून मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळत मिरावली पहाड परिसरात सापळा रचला आणि पाचही जणांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून ४ देशी पिस्तुल, १० जिवंत काडतूसे, १ कोयता, १ चाकू आणि २ लाख ७६ हजार रुपये किमतीचा इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुण्यातील ‘मकोका’ मधील आरोपींचा समावेश अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मुश्ताक शेख, विराट मेहंदळे, समर्थ माडळकर, समर्थ दूधभाते आणि आकाश पवार अशी आहेत. हे सर्व आरोपी मूळचे पुणे परिसरातील रहिवासी आहेत. अटक केलेल्या आरोपींपैकी समर्थ माडळकर आणि समर्थ दूधभाते हे दोघे आंदेकर टोळीचे मुख्य सक्रिय हस्तक असून, त्यांच्यावर यापूर्वी पुणे शहरात खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि थेट मकोका (MCOCA) सारखे अत्यंत गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पुण्यातील कारवाईनंतर या टोळीची दहशत संपली असे वाटत असतानाच, अहिल्यानगरात दरोडा टाकण्याचा त्यांचा हा पुढचा डाव पोलिसांनी वेळीच अपयशी ठरवला आहे. हे गुंड अहिल्यानगरात कोणाच्या इशाऱ्यावर आणि कोणाला लुटण्यासाठी आले होते, तसेच त्यांना स्थानिक पातळीवर कोणी मदत केली का, याचा कसून तपास आता पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *