
नवी दिल्ली (pragatbharat.com) : केंद्रीय नागरी सेवा परीक्षा (UPSC Civil Services Examination 2023) निकालाच्या संदर्भात दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्याबद्दल एका प्रसिद्ध खाजगी कोचिंग सेंटरला केंद्र सरकारने मोठा दणका दिला आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ अंतर्गत या कोचिंग इन्स्टिट्यूटवर ७ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी अधिकृतपणे ही माहिती दिली.
ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण आणि पारदर्शकता: केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या कारवाईचे समर्थन करताना म्हटले की, “या कडक कारवाईमुळे ग्राहकांचा (विद्यार्थ्यांचा) माहिती मिळवण्याचा अधिकार अधिक मजबूत झाला आहे. कोचिंग क्षेत्रात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि निष्पक्ष पद्धती सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे हे द्योतक आहे.” यूपीएससी सारख्या अत्यंत प्रतिष्ठेच्या परीक्षेत अनेकदा विद्यार्थी अशा भपकेबाज जाहिरातींना बळी पडतात, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
आतापर्यंत ६० हून अधिक नोटिसा; १.४६ कोटींचा दंड: मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोचिंग क्लासेसच्या अशा अनैतिक आणि फसव्या जाहिरातींवर चाप लावण्यासाठी सीसीपीए (CCPA) सातत्याने मोठी मोहीम राबवत आहे. प्राधिकरणाने आतापर्यंत देशभरातील विविध कोचिंग संस्थांना ६० हून अधिक नोटिसा बजावल्या आहेत. तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर एकूण १.४६ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करणे आणि त्यांना प्रवेश घेताना योग्य निर्णय घेता यावा यासाठी ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांमध्ये जागृतीची गरज: स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात लाखो विद्यार्थी आपले भवितव्य घडवण्यासाठी येतात. मात्र, अंतिम निकालात आपल्याच क्लासचे शेकडो विद्यार्थी चमकल्याचा खोटा किंवा अतिशयोक्तीपूर्ण दावा करणाऱ्या क्लासेसचे पेव फुटले आहे. या पार्श्वभूमीवर, सरकारी यंत्रणेने उचलेले हे पाऊल विद्यार्थ्यांची आर्थिक आणि मानसिक फसवणूक थांबवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.


