
पुणे (pragatbharat.com) : युक्रेनमधील झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पाच्या (Zaporizhzhia Nuclear Power Plant) एका टरबाइन इमारतीवर काल भीषण ड्रोन हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या कथित हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे (IAEA) महासंचालक राफेल ग्रॉसी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अणुप्रकल्पांवर किंवा त्यांच्या आसपास होणारे कोणतेही लष्करी हल्ले हे संपूर्ण जगासाठी गंभीर संकट ठरू शकतात, असा इशारा त्यांनी पुन्हा एकदा दिला आहे.
टरबाइन इमारतीच्या भिंतीला पडले छिद्र: ‘आयएईए’ने दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पाच्या प्रशासनाने त्यांना कळवले आहे की, एका ड्रोनने टरबाइन इमारतीला लक्ष्य केले, ज्यामुळे तिथल्या एका भिंतीला मोठे छिद्र पडले आहे. या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तिथे तैनात असलेल्या ‘IAEA’च्या तज्ज्ञ पथकाने त्या भागात जाण्याची परवानगी मागितली आहे. कोणत्याही परिस्थितीत अशा संवेदनशील स्थळांना लक्ष्य केले जाऊ नये, असे ग्रॉसी यांनी स्पष्ट केले.
युनिट ६ च्या संरचनेचे नुकसान, रशियाचा दावा: रशियाची सरकारी अणुऊर्जा कंपनी ‘रोसॅटॉम’ (Rosatom) ने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या एका ड्रोनने काल प्रकल्पाच्या ‘युनिट ६’ च्या टरबाइन बेटावर हा हल्ला केला. यामध्ये इमारतीच्या संरचनेचे काही प्रमाणात नुकसान झाले असले, तरी मुख्य आणि संवेदनशील उपकरणांना कोणतीही इजा झालेली नाही. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी किंवा मोठे रेडिएशनचे नुकसान वृत्त लिहिस्तर नोंदवले गेलेले नाही.
मार्च २०२२ पासून रशियाचे नियंत्रण: युरोपमधील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांपैकी एक असलेला हा झापोरिझ्झिया प्रकल्प मार्च २०२२ पासून रशियन सैन्याच्या नियंत्रणाखाली आहे. या प्रकल्पाच्या आजूबाजूला होत असलेल्या सततच्या लष्करी कारवायांमुळे अणु सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर अणुकेंद्रांच्या सुरक्षेसाठी विशेष संरक्षणाची मागणी केली जात आहे.


