NPPA Medicine Price Fixing: सर्वसामान्यांना मोठा दिलासा! मधुमेह, हृदयविकार आणि रक्तदाबाच्या ३० जीवनावश्यक औषधांच्या किमती केंद्र सरकारकडून निश्चित; MRP पेक्षा जास्त पैसे घेतल्यास कारवाई

नवी दिल्ली / मुंबई (pragatbharat.com) : दीर्घकालीन आजारांनी त्रस्त असलेल्या देश आणि राज्यातील लाखो रुग्णांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत दिलासादायक आणि मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार आणि राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने (NPPA) मधुमेह (Diabetes), उच्च रक्तदाब (Blood Pressure), हृदयविकार आणि किडनी उपचारांशी संबंधित तब्बल ३० अत्यावश्यक आणि जीवनावश्यक औषधांची कमाल किरकोळ किंमत (MRP) निश्चित केली आहे. एनपीपीएने जारी केलेला हा नवीन आदेश २७ मे २०२६ पासून देशभरात लागू झाला असून, आता कोणतीही फार्मसी किंवा मेडिकल स्टोअर निश्चित केलेल्या दरापेक्षा एक रुपयाही जास्त आकारू शकणार नाही.

औषध बाजारातील मनमानी किमतींना बसेल चाप: भारतातील औषध बाजारपेठेत एकाच घटकाचे औषध वेगवेगळ्या ब्रँडच्या नावाखाली आणि अत्यंत वेगवेगळ्या किमतींना विकले जाते, अशी ग्राहकांची मोठी तक्रार असते. एका मेडिकलमध्ये जे औषध १५ रुपयांना मिळते, तेच दुसऱ्या ब्रँडचे औषध ४० ते ५० रुपयांना विकले जाते. यामुळे रुग्णांचा मासिक औषधखर्च हजारो रुपयांवर पोहोचतो. आता सरकारने या ३० औषधांचे दर निश्चित केल्यामुळे कंपन्या आणि विक्रेत्यांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे. नियमांचे उल्लंघन करून जास्त दर आकारणाऱ्या दुकानदारांवर थेट कायदेशीर कारवाई केली जाईल.

कोणत्या आजाराचे औषध आता कितीला मिळणार? (निश्चित दर):

  • मधुमेह (Diabetes): विल्डाग्लिप्टिन आणि मेटफॉर्मिनची कॉम्बो टॅब्लेट आता कमाल ९.७९ रुपये प्रति गोळी मिळेल. तसेच सिटाग्लिप्टिन, ग्लिमेपिराइड आणि मेटफॉर्मिनची किंमत १०.३९ ते ११.९१ रुपये आणि टेनेलिग्लिप्टिन व डॅपाग्लिफ्लोझिनचा कॉम्बो १०.१७ रुपये प्रति टॅब्लेट निश्चित करण्यात आला आहे. यामुळे मधुमेहाचा मासिक खर्च ३०० ते ३६० रुपयांच्या आत येईल.
  • हृदयविकार आणि रक्तदाब (BP): बिसोप्रोलोल आणि ॲम्लोडिपिन कॉम्बोची किंमत ७.३१ ते ९.४० रुपये तर सि्लनिडिपिन आणि टेल्मिसार्टनच्या गोळ्या आता १२.९८ ते १४.९५ रुपये प्रति गोळी मिळतील. कोलेस्ट्रॉल कमी करणारे औषध ॲटोरवास्टॅटिन आणि फेनोफायब्रेट १८.४६ रुपये प्रति टॅब्लेट मिळेल.
  • किडनी/यकृत प्रत्यारोपण (Transplant): अवयव प्रत्यारोपणानंतर दिली जाणारी आणि अत्यंत महागडी मानली जाणारी ‘टॅक्रोलिमस प्रोलॉन्गड रिलीज कॅप्सूल’ आता प्रति कॅप्सूल १२७ रुपये या निश्चित दरानेच विकावी लागेल, ज्यामुळे अशा रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
  • इतर औषधे: हाडांच्या मजबुतीसाठी व्हिटॅमिन डी ३ ओरल सोल्यूशन १४.९१ ते १५.८८ रुपये प्रति मिली आणि ताप-वेदनेसाठी पॅरासिटामॉल, फेनिलेफ्राइन व क्लोरफेनिरामाइन गोळी अवघ्या ५.१५ रुपयांना मिळणार आहे.

अशी करा तक्रार: ग्राहकांनी औषधे खरेदी करताना पाकिटावरील छापील एमआरपी आवर्जून तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणताही दुकानदार निश्चित दरापेक्षा जास्त पैसे मागत असल्यास ग्राहक एनपीपीएच्या nppa.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर किंवा राज्य औषध नियंत्रक (State Drug Controller) कार्यालयात थेट तक्रार नोंदवू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *