Solapur Madha Farmer Protest 2026: ‘…तर पालकमंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही!’ सीना नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी माढा तहसीलवर शेतकऱ्यांचा भव्य धडक मोर्चा

सोलापूर/माढा (pragatbharat.com) : उन्हाचा पारा ४० ते ४५ अंशांवर पोहोचल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. माढा तालुक्यातील सीना नदी पूर्णपणे कोरडी पडली असून शेतकऱ्यांची उभी पिके जळू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर, सीना कोळेगाव धरणातून सीना नदीत तातडीने पाणी सोडण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी आज माढा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी भव्य धडक मोर्चा काढला. “पुढच्या तीन दिवसांत नदीत पाणी सोडले नाही, तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह आमदार, खासदारांना सोलापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही,” असा आक्रमक आणि थेट इशारा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिला आहे.

“आम्ही काय पाकिस्तानात राहतो का?” शेतकऱ्यांचा संतप्त सवाल: गेल्या वर्षी पावसाळ्यात सीना कोळेगाव धरणातून अचानक मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे सीना नदीला भयंकर पूर आला होता. त्या पुरामुळे शेती, जमिनी आणि घरांचे मोठे नुकसान झाले होते. “पावसाळ्यात पाणी सोडून आमचे नुकसान करता, मग आता हक्काच्या उन्हाळ्यात पिके जळत असताना पाणी का सोडले जात नाही? आम्ही काय पाकिस्तानात राहतो का?” असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी प्रशासनाला विचारला आहे. आता पाणी न सोडल्यास, पावसाळ्यातही धरणाचे पाणी नदीत सोडू देणार नाही, अशी टोकाची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

सर्वपक्षीय पाठिंबा आणि प्रमुख मागण्या: हा भव्य मोर्चा शिवसेना (शिंदे गट) नेते मनोज साठे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता. या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षानेही पाठिंबा दिला असून नेते संजय पाटील-घाटणेकर यांच्यासह विविध गावांतील सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत: १) सीना कोळेगाव धरणातून सीना नदीत शेतीसाठी त्वरित पाणी सोडण्यात यावे. २) उजनी धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करून समन्यायी वाटप करावे. ३) पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रलंबित नुकसानभरपाईची रक्कम तातडीने मिळावी. ४) सीना नदीवरील सर्व बंधाऱ्यांची दुरुस्ती करून नवीन दारे बसवावीत. ५) ग्रामीण भागात शेतीसाठी पूर्ण क्षमतेने १२ तास वीजपुरवठा करण्यात यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *