Kalyani Family Dispute: कल्याणी कुटुंबातील मालमत्तेचा वाद पेटला! सुगंधा हिरेमठ यांच्या दाव्याला स्थगिती देण्यास पुणे न्यायालयाचा नकार

पुणे (pragatbharat.com) : महाराष्ट्रातील अग्रगण्य आणि अत्यंत प्रतिष्ठित अशा कल्याणी उद्योग समूहाच्या (Kalyani Group) कल्याणी कुटुंबातील अंतर्गत मालमत्तेच्या वादाला आता एक मोठे आणि नाट्यमय वळण मिळाले आहे. कल्याणी कुटुंबातील कोट्यवधी रुपयांच्या हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) मालमत्तेच्या वाटणीबाबत सुगंधा हिरेमठ (Sugandha Hiremath) यांनी त्यांचे बंधू आणि कुटुंबातील इतर सदस्यांविरोधात दाखल केलेल्या नव्या फाळणीच्या दाव्याला (Partition Suit) स्थगिती देण्यास पुणे दिवाणी न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये आधीच अनेक खटले प्रलंबित असतानाही, हा नवीन खटला पुढे सुरू राहील, असा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयाने दिला आहे.

शीतल कल्याणी यांना मोठा धक्का: गौरीशंकर कल्याणी यांच्या कन्या शीतल कल्याणी (Sheetal Kalyani) यांनी दिवाणी प्रक्रिया संहितेच्या (CPC) कलम १० अंतर्गत सुगंधा हिरेमठ यांच्या २०२५ मधील नव्या दाव्याला स्थगिती देण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला होता. कल्याणी कुटुंबाच्या एकत्रित मालमत्तेच्या वाटणीबाबत २०१२, २०१४ आणि २०२४ मध्ये आधीच तीन खटले न्यायप्रविष्ट असल्याने या नव्या खटल्याची गरज नाही, असा युक्तिवाद शीतल कल्याणी यांच्या वतीने करण्यात आला होता. मात्र, न्यायाधीश जे. जी. पवार (Judge J.G. Pawar) यांनी हा युक्तिवाद फेटाळून लावत शीतल कल्याणी यांना मोठा कायदेशीर धक्का दिला आहे.

नवीन खटल्यात फसवणुकीचे गंभीर आरोप: न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर स्पष्ट केले की, सुगंधा हिरेमठ यांनी दाखल केलेल्या ताज्या दाव्यात अत्यंत वेगळे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. यामध्ये समाविष्ट असलेल्या मालमत्तांची व्याप्ती खूप मोठी आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा खटला नव्याने समोर आलेल्या फसवणुकीच्या (Fraud) आरोपांवर आधारित आहे. सुगंधा हिरेमठ यांचा असा दावा आहे कि, कल्याणी कुटुंबाची मोठी संपत्ती आणि मालमत्ता योग्य खुलासा न करता इतरत्र वर्ग करण्यात आली आहे. कल्याणी कुटुंबाच्या हक्काच्या मालमत्ता हडप करण्यासाठी रचण्यात आलेल्या एका मोठ्या कटाचा पर्दाफाश नुकताच झाल्याने, हा खटला चालवण्यासाठी त्यांच्याकडे नवीन आणि ठोस कारण असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला, जो न्यायालयाने ग्राह्य धरला आहे.

खटला पुढे सुरू राहणार: पुणे न्यायालयाने कल्याणी कुटुंबात प्रलंबित असलेल्या चार वेगवेगळ्या खटल्यांची सखोल तपासणी केली. त्यामध्ये असे दिसून आले की, काही खटले पुण्यातील मोजक्या मालमत्तांशी संबंधित आहेत, तर काहींमध्ये शेकडो कंपन्या, जंगम आणि स्थावर मालमत्तांचा समावेश आहे. नव्याने दाखल झालेल्या या दाव्यात मालमत्तेची बेकायदेशीर विल्हेवाट लावल्याचे गंभीर आरोप असल्याने, एका खटल्याचा निर्णय दुसऱ्या खटल्याला जसाच्या तसा लागू होऊ शकत नाही. या निर्णयामुळे आता पुणे न्यायालयात सुगंधा हिरेमठ यांच्या दाव्यावर पुढील सुनावणीचा मार्ग मोकळा झाला असून, कल्याणी समूहाच्या अंतर्गत मालमत्तांची रचना आणि मालकी हक्कांवर पुन्हा एकदा कायदेशीर खल होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *