
ठाणे/बीड (pragatbharat.com) : महाराष्ट्रात भ्रष्टाचारी सरकारी अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आपली मोहीम तीव्र केली आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी आणि बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे एसीबीच्या पथकाने दोन वेगवेगळ्या कारवाया करत लाचखोर अधिकाऱ्यांना रंगेहात अटक केली आहे. यात भिवंडी महानगरपालिकेच्या एका वरिष्ठ सहाय्यक आयुक्ताला तब्बल २.५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना, तर बीडमध्ये अपघाताच्या विम्यासाठी कागदपत्रे देण्याच्या मोबदल्यात १० हजारांची लाच घेणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल आणि होमगार्डला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
कारवाई १: भिवंडी पालिकेच्या सहाय्यक आयुक्ताला अडीच लाखांची लाच घेताना अटक भिवंडी-निझामपूर शहर महानगरपालिकेत (BNCMC) भूमापक-सह-इमारत निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या आणि सहाय्यक महानगरपालिका आयुक्त पदाचा अतिरिक्त प्रभार सांभाळणाऱ्या सुरेंद्र भास्कर भोईर या वरिष्ठ अधिकाऱ्याला ठाणे एसीबीने रंगेहात पकडले. एका बांधकाम साईटवरील अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई न करण्यासाठी किंवा दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी भोईर याने संबंधित सुपरवायझरकडे ५ लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती पहिला हप्ता म्हणून २.५ लाख रुपये देण्याचे ठरले.
तक्रारदाराने या प्रकरणी ठाणे एसीबीकडे तक्रार नोंदवली. मंगळवारी संध्याकाळी पद्मानगर येथील वॉर्ड ऑफिसच्या मागे उभ्या असलेल्या एका खाजगी कारमध्ये २.५ लाख रुपयांची रोकड स्वीकारत असताना एसीबीचे पोलीस निरीक्षक सचिन मोरे यांच्या पथकाने सुरेंद्र भोईरला रंगेहात बेड्या ठोकल्या.
कारवाई २: बीडमध्ये विम्याच्या कागदपत्रांसाठी लाच घेणारा पोलीस व होमगार्ड जाळ्यात दुसऱ्या घटनेत, बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय साहेबराव बळवंत (४१) आणि होमगार्ड रशीद दगडूखा पठाण (५२) यांना १० हजार रुपयांची लाच घेताना जालना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या वडिलांचा मार्च २०२६ मध्ये एका रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. अपघाती विम्याचा (Insurance Claim) दावा दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली अधिकृत पोलीस कागदपत्रे देण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल बळवंत याने १५ हजार रुपयांची लाच मागितली होती, जी तडजोडीनंतर १० हजार ठरली. तक्रारदाराने जालना एसीबीकडे धाव घेतली. एसीबीचे उपअधीक्षक बाळू संपती जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी लावलेल्या सापळ्यात होमगार्ड पठाणला १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. दोन्ही आरोपींच्या घरांची झडती सुरू असून त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


