
अमरावती/नागपूर (pragatbharat.com) : विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीला आता अत्यंत नाट्यमय आणि वादळी वळण मिळाले आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षजीत देशमुख हे अचानक वैद्यकीय कारणास्तव नागपूर येथील रुग्णालयात दाखल झाल्याने काँग्रेसच्या माजी मंत्री व आक्रमक नेत्या यशोमती ठाकूर यांनी त्यांच्यावर १५ ते २० कोटी रुपये घेऊन भाजपसोबत ‘मॅनेज’ झाल्याचा आणि घोडेबाजार केल्याचा थेट आरोप केला होता. आता या गंभीर आरोपांवर हर्षजीत देशमुख यांनी थेट नागपूरच्या रुग्णालयातूनच बॉम्बगोळा टाकला आहे. “मी मॅनेज होणारा माणूस नाही, कदाचित यशोमती ठाकूर याच भाजपला मॅनेज झाल्या आहेत आणि त्यांना काँग्रेसचे नुकसान करून भाजपला फायदा पोहोचवायचा आहे,” असा खळबळजनक पलटवार देशमुखांनी केला आहे.
“मी निवडणुकीतून माघार घेणार नाही” – हर्षजीत देशमुख रुग्णालयातून आपली भूमिका मांडताना हर्षजीत देशमुख पुढे म्हणाले, “माझ्या तब्येतीची कोणतीही अधिकृत माहिती न घेता माझ्यावर कोट्यवधींच्या देवाणघेवाणीचे बिनबुडाचे आरोप करणे अत्यंत दुर्दैवी आहे. मला भेटायला काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांच्यासारख्या मोजक्या नेत्यांशिवाय कोणीही आले नाही. मी निवडणुकीतून अजिबात माघार घेतलेली नाही आणि घेणारही नाही. काँग्रेस पक्ष अमरावतीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याची चर्चा मी ऐकली आहे. नेत्यांना जे ठरवायचे आहे ते ठरवू द्या, मी मात्र निवडणुकीच्या रिंगणात ठाम असून मतदारांशी डिजिटल माध्यमातून संपर्क ठेवत आहे. मला डिस्चार्ज मिळायला आणखी दोन दिवस लागतील, त्यानंतर मी थेट अमरावतीत मैदानात उतरणार आहे.” यशोमती ठाकूर या केवळ माझीच नाही तर काँग्रेस पक्षाचीही बदनामी करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
“हॉस्पिटलमध्ये राहून नाटक कशासाठी?” – यशोमती ठाकूर यांचे प्रत्युत्तर हर्षजीत देशमुखांच्या या गंभीर पलटवारानंतर यशोमती ठाकूर आणखीच आक्रमक झाल्या आहेत. देशमुखांना जाहीर आव्हान देताना त्या म्हणाल्या, “जर तुमच्यात हिंमत असेल आणि तुम्ही तयार असाल, तर चला मैदानात या! उद्याच बाहेर पडा आणि प्रचाराची सुरुवात करा. निवडणुकीला अवघे चार-पाच दिवस शिल्लक राहिले असताना हॉस्पिटलमध्ये राहून कशासाठी नाटक करत आहात? देशमुखांचे प्रत्येक वक्तव्य हे भाजपला कसा फायदा होईल असेच आहे. डिजिटल माध्यमातून प्रचार करणे हा निव्वळ बालिशपणा आहे.”
काँग्रेस नेत्यांची अमरावतीत तातडीची बैठक हर्षजीत देशमुख गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्हाध्यक्षांसह पक्षातील प्रमुख नेत्यांच्या संपर्कात नसल्याने आणि संशयास्पद रित्या रुग्णालयात दाखल झाल्याने काँग्रेस बॅकफूटवर आली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीत पक्षाची पुढील अधिकृत भूमिका काय असावी, बंडखोरी मोडून काढण्यासाठी कोणाला पाठिंबा द्यायचा, यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी आज यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख आणि नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावतीत एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीनंतर अमरावतीच्या राजकीय समीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


