
मुंबई (pragatbharat.com) : अनुसूचित जातीच्या (SC) आरक्षणामध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या उपवर्गीकरणाच्या (Sub-categorization) निर्णयावरून राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय चर्मकार महासंघाने या उपवर्गीकरणाच्या निर्णयाला आपला ठाम विरोध दर्शवला आहे. महासंघाच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने नुकतीच रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती माननीय श्री. आनंदराज आंबेडकर यांची दादर येथील त्यांच्या जनसंपर्क दालनात अधिकृत भेट घेतली. या भेटीदरम्यान महासंघाच्या वतीने या गंभीर मुद्द्यावर पक्षाची आणि समाजाची दिशा स्पष्ट करणारे ‘भूमिका’ हे प्रकाशित पुस्तक त्यांना सप्रेम भेट म्हणून सादर करण्यात आले.

बबनराव घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाची भेट राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक व अध्यक्ष तथा माजी समाजकल्याण मंत्री आदरणीय बबनराव (नाना) घोलप साहेब यांच्या थेट आदेशानुसार आणि प्रमुख उपस्थितीत ही भेट पार पडली. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. शांताराम कारंडे यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळाने आरक्षणातील उपवर्गीकरणामुळे बहुजन आणि वंचित समाजात निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य फुटीबद्दल चिंता व्यक्त केली. या प्रसंगी राष्ट्रीय सचिव दत्तात्रेय गोतीसे, मुंबई अध्यक्ष श्रीधर ठोंबरे, मुंबई सचिव जगदीश लाड आणि संदीप लिंगायत यांच्यासह महासंघाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
आनंदराज आंबेडकरांच्या भूमिकेला महासंघाचा जाहीर पाठिंबा आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांनी घेतलेल्या आक्रमक आणि कायदेशीर भूमिकेला राष्ट्रीय चर्मकार महासंघाने आपला पूर्ण व जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. अनुसूचित जातीच्या मूळ आरक्षणाला धक्का न लावता समाजाची एकजूट टिकवून ठेवणे काळाची गरज असल्याचे या वेळी शिष्टमंडळाने नमूद केले. या भेटीमुळे आगामी काळात आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यातील दलित आणि वंचित घटकांच्या संघटना अधिक आक्रमक होण्याची आणि एकवटण्याची चिन्हे दिसत आहेत.



