
मुंबई/सायन (pragatbharat.com) : मुंबईकरांसाठी, विशेषतः मध्य रेल्वे आणि सायन-धारावी परिसरातून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. मुंबईतील ११० वर्षे जुना आणि ऐतिहासिक महत्त्व असलेला सायन रस्ता उड्डाणपूल (Sion Road Over Bridge) पुन्हा सुरू होण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल पडले आहे. मध्य रेल्वेने (Central Railway) शनिवार आणि रविवारच्या (१३ आणि १४ जून २०२६) मध्यरात्री एक मोठा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेऊन पुलाचे नवीन गर्डर रेल्वे लाईनवर यशस्वीरीत्या लाँच केले आहेत. यामुळे पुलाची एक लेन लवकरच वाहतुकीसाठी सज्ज होणार आहे.
अंबालावरून आले गर्डर, ४ तासांत काम फत्ते: रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उड्डाणपुलासाठी लागणारे गर्डर विशेषत्वाने हरियाणामधील अंबाला येथून मागवण्यात आले होते आणि सायन येथील कल्याण एंडला ते एकत्र (Assemble) करण्यात आले होते. १३ जूनच्या मध्यरात्री १२:१० ते पहाटे ४:१० या ४ तासांच्या विशेष ब्लॉक दरम्यान हे महाकाय गर्डर पुलाच्या संरचनेवर ढकलण्यात (Push) आले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते कुर्ला दरम्यानच्या ५ व्या आणि ६ व्या रेल्वे लाईनच्या विस्तारीकरणाचा हा एक भाग आहे. या वर्षअखेरपर्यंत पुलाची एक लेन वाहतुकीसाठी खुली केली जाईल, ज्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्ग (EEH), एलबीएस मार्ग (LBS Road) आणि धारावी मार्ग पुन्हा जोडले जातील.
आयआयटीच्या ऑडिटनंतर पूल ठरला होता धोकादायक: हा ऐतिहासिक पूल अत्यंत जीर्ण झाल्याने २०२० मध्येच आयआयटी मुंबईच्या (IIT Bombay) स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये तो असुरक्षित घोषित करण्यात आला होता. मध्य रेल्वे आणि मुंबई महानगरपालिका (BMC) संयुक्तपणे या पुलाची पुनर्बांधणी करत आहेत. जुन्या पुलाची लांबी ४० मीटर होती, ती आता वाढवून ५१ मीटर करण्यात आली आहे. या कामासाठी घेतलेल्या ब्लॉकमुळे हुबळी-सिद्धापूर एक्सप्रेस, कोणार्क एक्सप्रेस, हावडा-सीएसएमटी आणि मंगळुरू-सीएसएमटी या लांब पल्ल्याच्या गाड्या काही काळ रोखून धरण्यात आल्या होत्या, तर सीएसएमटी ते कुर्ला आणि ठाणे ते कल्याण दरम्यानची लोकल वाहतूक अंशतः विस्कळीत झाली होती. काही लोकल कुर्ला, ठाणे आणि कल्याण स्थानकांवरूनच चालवण्यात आल्या.



