
मुंबई/नवी दिल्ली (pragatbharat.com) : भारतीय ॲथलेटिक्स जगतातून एक अत्यंत अभिमानास्पद आणि सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावी अशी बातमी समोर आली आहे. भारताचा अव्वल २४ वर्षीय अडथळा शर्यतपटू तेजस शिरसे (Tejas Shirse) याने ‘इंडियन ॲथलेटिक्स सिरीज ९’ (Indian Athletics Series 9) मध्ये पुरुषांच्या ११० मीटर अडथळा शर्यतीत (110m Hurdles) स्वतःचाच जुना राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत एक नवा इतिहास रचला आहे. तेजसने हा पराक्रम करताना आगामी ग्लासगो राष्ट्रकुल खेळ २०२६ (Commonwealth Games 2026) चे पात्रता निकष पार करत आपले स्थान देखील पक्के केले आहे.
स्वतःचाच विक्रम ०.१४ सेकंदांनी सुधारला: रिलायन्स फाऊंडेशनचे (Reliance Foundation) प्रतिनिधित्व करणाऱ्या तेजस शिरसेने शनिवारी झालेल्या या शर्यतीत अवघ्या १३.२७ सेकंदांत अंतर पार करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. यापूर्वीचा १३.४१ सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम देखील तेजसच्याच नावावर होता, जो त्याने तब्बल ०.१४ सेकंदांच्या फरकाने सुधारला आहे. या कामगिरीसह तेजसची ही वेळ २०२६ मधील आशियाई ॲथलीट्समध्ये पुरुषांच्या ११० मीटर अडथळा शर्यतीतील सहावी सर्वात वेगवान वेळ ठरली आहे. ग्लासगो येथे २३ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ दरम्यान राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा रंगणार आहेत.
“दडपण न घेता फ्री-हिट सारखा खेळलो” – तेजस शिरसे: या ऐतिहासिक कामगिरीनंतर अत्यंत आनंदी असलेल्या तेजसने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “रांची आणि तैवान येथे झालेल्या स्पर्धांमध्ये व्यासपीठावर (Podium) स्थान मिळवूनही मी अत्यंत थोड्या फरकाने राष्ट्रकुल पात्रता रेषेपासून दूर राहिलो होतो. त्यामुळे आज मी माझी मानसिकता बदलली. मी स्वतःला सांगितले की ही शर्यत म्हणजे ‘फ्री-हिट’ (Free Hit) आहे. यात परफेक्ट शॉट शोधायचा नसतो, तर चेंडू थेट सीमारेषेबाहेर मारायचा असतो. मी कोणताही मानसिक दबाव न घेता, अगदी सरावासारखी ही शर्यत पळालो आणि शेवटी माझ्या पायांनाच त्यांचे काम करू दिले.”
तेजसचे मुख्य प्रशिक्षक जेम्स हिलियर (James Hillier) यांनी त्याचे कौतुक करताना म्हटले की, “वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या दुखापतीतून तेजसने ज्या प्रकारे पुनरागमन केले आहे, ते कौतुकास्पद आहे. त्याच्या कठोर परिश्रमाचे हे फळ आहे.”


