
पुणे (pragatbharat.com) : आजच्या धकाधकीच्या आणि बैठी जीवनशैलीच्या युगात वाढते वजन (Obesity) ही अनेकांसाठी एक सर्वात मोठी समस्या बनली आहे. वजन झपाट्याने वाढते, पण ते कमी करताना शरीराची प्रचंड दमछाक होते. अनेक जण वजन कमी करण्यासाठी तासनतास व्यायाम करतात आणि आहारावर कठोर नियंत्रण (Dieting) ठेवतात. मात्र, यामुळे शरीरात तीव्र थकवा येण्याची शक्यता असते. यावर सोपा उपाय म्हणून प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर अमारा यांनी एक अत्यंत उपयुक्त सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, कठोर आहाराऐवजी रात्री झोपण्यापूर्वी काही आरोग्यदायी पेयांचे (Healthy Drinks) सेवन केल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी वेगाने कमी होण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मोठी मदत होते.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी उपयुक्त ठरणारी ५ मुख्य पेय खालीलप्रमाणे आहेत:
१. कोमट पाणी आणि लिंबाचा रस: रात्री झोपण्यापूर्वी किमान २० ते ३० मिनिटे आधी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस पिळून प्यायल्याने पचनक्रिया अतिशय सुलभ होते. हे पेय शरीरातील चयापचय क्रिया (Metabolism) वाढवते, ज्यामुळे रात्री झोपेतही चरबी कमी होण्याची प्रक्रिया सुरू राहते आणि पोट फुगण्याचा त्रास कमी होतो.
२. दालचिनीचे पाणी: रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) नियंत्रित ठेवण्यासाठी दालचिनी हा एक उत्तम घरगुती उपाय आहे. दालचिनीमुळे भूक नियंत्रित राहते. हे पेय तयार करण्यासाठी एका ग्लास पाण्यात एक चमचा दालचिनीची पूड किंवा एक लहान तुकडा टाकून ते ५ मिनिटे चांगले उकळवावे आणि कोमट करून प्यावे.
३. आलं आणि ग्रीन टी: पोटाची चरबी (Belly Fat) कमी करण्यासाठी आल्याचा चहा अत्यंत गुणकारी मानला जातो. एका ग्लास उकळत्या पाण्यात आल्याचा एक छोटा तुकडा किसून टाकावा आणि त्यात ग्रीन टी बॅग काही वेळ भिजवून ठेवावी. हे पेय गाळून प्यायल्याने शरीराला चांगली झोप लागते आणि वजन कमी होते.
४. ॲपल सायडर व्हिनेगर आणि आलं: ॲपल सायडर व्हिनेगर शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर टाकण्यास मदत करते. एका ग्लास कोमट पाण्यात एक मोठा चमचा ॲपल सायडर व्हिनेगर आणि एक छोटा चमचा किसलेले आलं मिसळून झोपण्याच्या ३0 मिनिटे आधी प्यायल्याने पोटाचे आरोग्य उत्तम राहते.
५. कॅमोमाइल टी (Chamomile Tea): हा एक उत्तम हर्बल चहा असून यामुळे मेंदू शांत होतो आणि शांत झोप लागते. वजन कमी करण्यासाठी शरीराला पुरेशी आणि शांत झोप मिळणे अत्यंत आवश्यक असते. एका ग्लास कोमट पाण्यात कॅमोमाइल टी बॅग ५ मिनिटे भिजवून तुम्ही हा चहा घेऊ शकता.
महत्त्वाची टीप: जर तुम्हाला कोणताही जुना आजार किंवा ॲलर्जी असेल, तर हे उपाय सुरू करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञ आहारतज्ज्ञांचा (Dietitian) सल्ला आवर्जून घ्यावा.


