
मुंबई (pragatbharat.com) : स्वतःच्याच कंपनीचे लाखो रुपयांचे सोने हडप करण्यासाठी अपघाताचा आणि दरोड्याचा खोटा बनाव रचणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा डाव मुंबई पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे उधळून लावला आहे. एमआयडीसी (MIDC) पोलिसांनी ‘गोल्डस्टार’ ज्वेलरी कंपनीच्या कर्मचाऱ्यासह त्याच्या साथीदाराला अटक करून ६० लाख ६५ हजार ६५६ रुपयांचे संपूर्ण सोने हस्तगत केले आहे.
असा रचला होता दरोड्याचा खोटा बनाव: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश गंगाधर कदम (२६) हा गोल्डस्टार कंपनीत कामाला होता. कंपनीने त्याला ६०.६५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने डिलिव्हरीसाठी दिले होते. काही वेळानंतर अविनाशने कंपनीला फोन करून सांगितले की, दुचाकीवरून जात असताना त्याचा मोठा अपघात झाला, ज्यामध्ये तो बेशुद्ध पडला आणि अज्ञात चोरट्यांनी त्याच्या जवळील सर्व दागिने लुटून नेले. तो उपचाराचे नाटक करण्यासाठी रुग्णालयातही दाखल झाला.
दुखापत नाही आणि पोलिसांना संशय तपासादरम्यान पोलिसांना अविनाशच्या सांगण्यात अनेक विसंगती आढळल्या. एवढा मोठा अपघात झाल्याचा दावा करूनही त्याच्या शरीरावर एकही जखम किंवा दुखापत नव्हती. पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवून घटनास्थळावरील आणि परिसरातील शेकडो सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले. त्यामध्ये एक संशयास्पद व्यक्ती घटनास्थळाच्या आसपास वारंवार घुटमळताना दिसली.
पोलिसांनी माग काढून त्या संशयास्पद व्यक्तीला ताब्यात घेतले, ज्याची ओळख मनोज हनुमंत जोगदंड (४१) म्हणून झाली. पोलिसी खाक्या दाखवताच अविनाश आणि मनोज या दोघांनी मिळून सोने हडप करण्यासाठी हा संपूर्ण कट रचल्याची कबुली दिली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात मोठी कामगिरी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, विशेष पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) डॉ. मनोज कुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख आणि उपायुक्त दत्त नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र वाणी, गुन्हे शाखेचे निरीक्षक महेश गुरव आणि उपनिरीक्षक किरण परबत यांच्या शोध पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
मालाडमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या मदतीनेच लॉकरमधून चोरी, दोघे जेरबंद
मुंबईतीलच दुसऱ्या एका घटनेत, मालाड वेस्ट येथील ‘माइंडस्पेस’ मधील एका बीपीओ (BPO) कंपनीच्या लॉकर रूममधून कर्मचाऱ्यांचे फोन आणि रोकड चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. बांगूर नगर पोलिसांनी याप्रकरणी कंपनीचा कर्मचारी आदित्य दास (२३) आणि त्याचा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला मित्र प्रतीक सकपाळ (२१) या दोघांना अटक केली आहे.
आदित्यने स्वतः चोरी न करता, त्याचा मित्र प्रतीक याला कंपनीत प्रवेश करण्यासाठी आपले अधिकृत अॅक्सेस कार्ड (Access Card) दिले होते. प्रतीकवर आधीच दादर, नेहरू नगर आणि पनवेल येथे चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. कंपनीच्या ओपन लॉकर रूमचा गैरफायदा घेत आरोपीने सहकाऱ्यांचे साहित्य लंपास केले होते, मात्र पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने दोघांना बेड्या ठोकल्या.


