नामांकित शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्रतीक मुणगेकर यांची कार चोरणारा माजी चालक गजाआड; भोईवाडा पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई (pragatbharat.com) : वर्ल्ड पीस कमिटीचे (भारत) अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय वक्ते आणि नामांकित शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्रतीक राजन मुणगेकर यांची अलिशान कार चोरल्याप्रकरणी मुंबईच्या भोईवाडा पोलिसांनी त्यांच्याच एका माजी चालकाला अटक केली आहे. पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अत्यंत वेगाने तपास करत अवघ्या दोन दिवसांत आरोपीला बेड्या ठोकल्या असून, चोरीला गेलेली मारुती सुझुकी वॅगनआर (WagonR) कार जप्त केली आहे.

माजी चालकानेच केला विश्वासघात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव फैजाज अहमद शेख (वय ३५ वर्षे, रा. बाबू दादा चाळ, उल्हासनगर) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉ. मुणगेकर यांनी त्यांची वॅगनआर कार परळ येथील आयटीसी (ITC) हॉटेल सिग्नलजवळ पार्क केली होती. ११ जून रोजी पहाटेच्या सुमारास ही कार चोरीला गेल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

असा लागला चोरीचा छडा तपासाच्या सुरुवातीला पोलिसांना घटनास्थळावरून कोणतेही सीसीटीव्ही (CCTV) फुटेज मिळाले नव्हते. मात्र, पोलिसांनी जेव्हा डॉ. मुणगेकर यांच्याकडे सखोल चौकशी केली, तेव्हा त्यांनी सांगितले की, काही महिन्यांपूर्वी त्यांच्याकडे काम करणाऱ्या एका चालकाने कारची दुसरी चावी (Spare Key) परत केली नव्हती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित माजी चालक फैजाज शेख याच्यावर लक्ष केंद्रित केले, ज्याने सुमारे तीन महिने चालक म्हणून काम केले होते. त्याच्या मोबाईलचे कॉल डिटेल रेकॉर्ड्स (CDR) तपासले असता, चोरीच्या रात्री त्याचे लोकेशन परळमधील पार्किंग स्पॉटजवळ असल्याचे निष्पन्न झाले.

नंबर प्लेट बदलून उत्तर प्रदेशात पळ काढण्याचा होता प्लॅन भोईवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) सचिन बोरसे यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने उल्हासनगर परिसरात तब्बल २४ तास पाळत ठेवून आरोपी फैजाज शेखला ताब्यात घेतले. चोरी उघडकीस येऊ नये म्हणून आरोपीने कारची नंबर प्लेट बदलली होती आणि तो कार घेऊन उत्तर प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता. आर्थिक अडचणीत असल्यामुळे कार विकण्याच्या किंवा ती स्वतःच्या गावी वापरण्याच्या उद्देशाने त्याने ही चोरी केल्याची कबुली दिली आहे. न्यायालयाने आरोपीची रवानगी न्यायिक कोठडीत केली आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस उपायुक्त (परिमंडळ २) अनुराग जैन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ठाकूर आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) नितीन महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *